

कोल्हापूर : ‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ ही वर्षानुवर्षे चालत आलेली म्हण, आता बदलण्याची संधी नागरिकांना आली आहे. प्रशासकीय कामकाजातील विविध पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आता थेट नागरिकांनाच सूचना देता येणार आहेत. याकरिता ‘सुधारणा उत्सव २०२६’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.‘सुधारणा उत्सव’ या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या दैनंदिन अनुभवातून शासकीय सेवा मिळताना होणारा विलंब, अनावश्यक प्रक्रिया, दस्तऐवजांची पुनरावृत्ती आणि मंजुरीचे किचकट टप्पे दूर करून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकभिमुख करणे हा आहे. त्याकरिता संपूर्ण यंत्रणेत सुधारणा घडवून आणणाऱ्या व्यापक व संरचनात्मक सूचना, तंत्रज्ञानाचा वापर, प्रक्रियेचे सुलभीकरण आणि कागदपत्रांची अट शिथिल करणे याबाबतच्या सूचनांना प्राधान्य दिले जाणार आहे.
३१ ऑक्टोबरपर्यंत रिफॉर्म उत्सव पोर्टलवर सूचना नोंदवता येणार
या अभियानांतर्गत दिनांक २ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘जन मंथन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक जन मंथन सभा आयोजित केली जाईल. नागरी भागातही विशेष बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या सूचना रिफॉर्म उत्सव पोर्टल द्वारे नोंदवाव्या लागणार आहेत.
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा : डॉ. राठोड
सुधारणा उत्सव या राष्ट्रव्यापी अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या. शासकीय सेवा वितरण अधिक सुलभ व परिणामकारक बनवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सर्व घटकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रशासकीय प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बैठकीत केले.
वैयक्तिक नव्हे तर सार्वजनिक प्रकरणांवर आधारित सूचना
सूचना करताना वैयक्तिक प्रकरणांवर करू नका. त्याऐवजी सार्वजनिक स्वरूपाच्या प्रकरणांवर सूचना असाव्यात. उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे असावित, कोणती कागदपत्रे गैरलागू आहेत ती रद्द करावी वगैरे.