

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात सध्या वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असून, संपूर्ण तालुका दहशतीच्या सावटाखाली आहे. वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये बिबट्या, तरस आणि गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. केवळ पाळीव जनावरांचे प्राणच धोक्यात नाहीत, तर हाता तोंडाशी आलेली पिकेही रानडुकरे आणि गव्यांकडून उद्ध्वस्त केली जात आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात हिंस्र प्राण्यांनी पाळीव जनावरांना आपले लक्ष्य केले आहे. शेळ्या, मेंढ्या, गायी आणि वासरांवर दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. आतापर्यंत शेकडो जनावरांचा बळी गेल्याने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रभर जागून आपल्या गोठ्यांचे रक्षण करत आहेत.
रविवारी सकाळी सांबू (ता. शाहूवाडी) येथे एक थरारक घटना घडली. रात्रभर शेतातील पिकांचा फडशा पाडल्यानंतर, सकाळी ७ वाजेच्या सुमारास गव्यांचा एक मोठा कळप गावालगतच्या शेतात दिसून आला. यावेळी गावातील महिलांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा करत या गव्यांना डोंगराच्या दिशेने पिटाळून लावले. मात्र, दिवसाढवळ्या वस्तीनजीक गवे येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वन्यजीवांच्या या वाढत्या उपद्रवामुळे शाहूवाडीतील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. संध्याकाळनंतर महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंतेत आहेत. ऊस, भात, नाचणी आणि भाजीपाल्याचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांचा हा धुमाकूळ थांबवण्यासाठी वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.