Nitin Gadkari | विरोधकांच्या गळ्यातील ताईत असलेले गडकरी अचानक टीकेचे लक्ष्य का बनले?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि समाजमाध्यमांतून टीकेची झोड; ‘मिस्टर परफॉर्मन्स’ची प्रतिमा धूसर करण्याचे षड्‌यंत्र?
Nitin Gadkari
नितीन गडकरी  File Photo
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : रस्ते विकासातील विक्रमी कामगिरी, स्पष्ट वक्तेपणा, विरोधी पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आणि राजकीय कटुतेपासून दूर राहण्याची शैली, यामुळे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक विरोधकांकडूनही अनेकदा झाले. पायाभूत सुविधांमधील क्रांतिकारक बदलांमुळे विरोधकही त्यांना ‘मिस्टर परफॉर्मन्स’ म्हणून संबोधत होते. कालपरवापर्यंतचे हे चित्र होते. परंतु, गेल्या काही आठवड्यांत हेच गडकरी अचानक टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. समाजमाध्यमांवर त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या टीकाप्रहारांना अधिक महत्त्व आहे. विरोधकांच्याही गळ्यातील ताईत असलेले गडकरी अचानक टीकेचे लक्ष्य का बनले?

इंधनावरील परकीय अवलंबित्‍व कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे आणि पर्यावरणातील प्रदूषणाची वाढती मात्रा रोखणे, याकरिता सरकारने पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम जाहीर केला. त्याची पायाभरणी संयुक्त आघाडी सरकारचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळामध्येच झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये हा कार्यक्रम गतिमान झाला. त्याचा मुख्य कणा म्हणून गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन दिले. वाहन कंपन्यांना त्यासाठी अनुषंगिक फ्लेक्स इंजिन बनविण्यासाठी डेटलाईन ठरवून दिली. यामुळेच इथेनॉलनिर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपेक्षा अगोदर पूर्ण झाले. तसे १० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. तो १५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत पोहोचला, तरीही वाहनधारकांतून वा विरोधकांकडून इथेनॉलमिश्रित पेट्रोलवर ओरड झाली नाही; मग अचानक गडकरी यांच्यावर ही टीका का सुरू झाली? गडकरी यांच्यावर सध्या विरोधकांकडून दोन आरोप होत आहेत. पहिला, इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या परिणामांचा. ई-२० पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होते, वाहनांचे आयुष्य कमी होते आणि मायलेज घसरते, तर दुसर्‍या आरोपामध्ये गडकरी यांच्या कुटुंबीयांशी संबंधित इथेनॉल उद्योगाला लाभ मिळवून देण्यासाठी ते वाहनधारकांना अडचणीत टाकत आहेत, अशी टीका आहे.

पहिल्या आरोपासाठी वैज्ञानिक अभ्यास आणि वाहन उद्योगाचे मत घेणे आवश्यक ठरते. यानुसार, ई-२० साठी डिझाईन केलेल्या वाहनांमध्ये इंजिनचे असामान्य नुकसान झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. देशातील आणि बहुराष्ट्रीय वाहन उद्योगांनीही हे आरोप फेटाळेले आहेत. परंतु, ई-२० साठी सज्ज नसलेल्या जुन्या वाहनांमध्ये रबर सील, इंधन नळ्या, धातूचे भाग आणि इंधन प्रणालीवर परिणाम होऊ शकतो. इथेनॉलची ऊर्जाघनता पेट्रोलपेक्षा कमी असल्याने साधारण ३ ते ७ टक्के मायलेजही घटू शकते. अर्थात, १०० टक्के पेट्रोलवरून इथेनॉलमिश्रित पेट्रोलकडे वळताना या अडचणीला सामोरे जावे लागलेच असते. ब्राझीललाही याच अडचणीतून जावे लागले.

दुसरा मुद्दा गडकरींच्या कुटुंबीयांच्या व्यक्तिगत लाभाचा. गडकरींच्या कुटुंबीयांचे पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड, सियान अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मानस अ‍ॅग्रो लिमिटेड हे प्रकल्प इथेनॉलनिर्मितीशी संबंधित आहेत. या उद्योगातून निर्माण होणारे इथेनॉल देशात निर्माण होणार्‍या एकूण इथेनॉलच्या तुलनेत एक टक्क्यापेक्षाही कमी आहे आणि इथेनॉलला आधारभूत किंमत ठरविण्याचे अधिकार केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आहेत. यामध्ये गडकरींचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येत नाही. (पूर्वार्ध)

सकारात्मक बदल

भारतासारख्या देशात लोकसंख्या सर्वाधिक, वाहनसंख्या मोठी असल्यामुळे त्याचे परिणाम जाणवतात. तथापि, इथेनॉल मिश्रणाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे जो सकारात्मक बदल देशाच्या अर्थकारणावर, शेती व्यवस्थेवर झाला, त्यातून जे आत्मनिर्भरतेकडे पाऊल पडले, ते दुर्लक्षिता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news