Gokul Election | गोकुळच्या किकवीतील जागा खरेदीबाबत वस्तुस्थितीच्या मिरचीचा ठसका राजवर्धन निंबाळकर यांना का लागला?

राष्ट्रवादीचे कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील-कुरुकलीकर यांचा सवाल
Gokul Election  |
Gokul Election | गोकुळच्या किकवीतील जागा खरेदीबाबत वस्तुस्थितीच्या मिरचीचा ठसका राजवर्धन निंबाळकर यांना का लागला? pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : अदृश्य शक्तींनी काही संघटनांना माहिती पुरवून जाणीवपूर्वक बातम्यांमधून बदनामी घडवून आणल्याची खात्रीलायक माहिती समजताच गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने वस्तुस्थिती दर्शविणारे निवेदन प्रसिद्धीला दिले. वास्तविक; या विषयाशी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक- निंबाळकर यांचा काहीही संबंध नाही. खरेतर अदृश्य शक्तींकडून आपल्या खांद्याचा असा वापर होऊ देण्यापासून राजवर्धन नाईक- निंबाळकर यांनी सावध राहिले पाहिजे, असे आवाहन कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर यांनी केले आहे.

दरम्यान, हा विषय पक्षीय पातळीवर नेत नाईक - निंबाळकर यांनी हा खुलासा केल्यामुळे मला राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणून नाइलाजास्तव हे प्रत्युत्तर द्यावे लागत आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन मीही त्यांना काही प्रश्न विचारणार आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, माजी संचालकांच्या निवेदनात ‘मे. गायत्री कोल्ड स्टोरेज- प्रोप्रायटर विजय ढेरे, पुणे’ एवढेच नाव लिहिले होते. महायुती म्हणून एकत्रित लढायचे असल्यामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे ते जावई आहेत हे मुद्दाम लिहिले नव्हते. परंतु; त्या ठेक्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यामुळे लोकांना समजण्यासाठी निव्वळ नावच दिले होते. श्री. ढेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत असे नाईक- निंबाळकर यांचे म्हणणे आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत याचा अर्थ त्यांना दरोडे घालायचे लायसन मिळाले असा होत नाही.

दुसरे म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ, नविद मुश्रीफ यांच्या जन्माच्या आधीपासूनचे ऋणानुबंध नाईक- निंबाळकर सांगतात. वास्तविक; यामध्ये आमचे नेते हसन मुश्रीफ व गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा उल्लेखच यायला नको होता. मग या रागापोटी आम्ही ‘३५ वर्षे जावयाला ३५० कोटींचा हुंडा दिला आणि आयुष्यभर हुंडा देण्यासाठीच किकवीचा प्रकल्प त्यांना नको होता. या प्रकल्पामुळे यापुढे आता जावयाला हुंडा मिळणार नाही म्हणून झटका लागला आहे का?’, असे विचारले तर आमचे काय चुकले?

नाईक- निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ईडी यांना जरूर भेटावे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतची माहिती घेतलेली आहे. त्याबाबतची माहिती तुम्हाला आमदार डाॅ. विनय कोरे देतील. आता राहिला प्रश्न ईडीचा. ईडीची मदत घ्या किंवा अगदी इंटरपोलचीसुद्धा मदत घ्या. हा व्यवहार पारदर्शी आणि दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय झालेला आहे. किकवीचा प्रकल्प उभारून आम्ही एका वेठबिगारीतून कायमस्वरूपी मुक्त झालेलो आहोत. ते ‘श्वेतपत्रिका काढा’ म्हणतात. त्यावर गोकुळ दूध संघाची निवडणूक होताच आम्ही सगळ्या गोष्टी खुलासेवार मांडणारच आहोत. त्याची चर्चा यापूर्वीही केलेलीच आहे. गोकुळ दूध संघाचे प्रशासक मंडळ या जागेबाबत आता जरी ठराव करून देत असेल, तर बाजारात आजही १० कोटी रुपये ज्यादा देऊन गिऱ्हाईक तयार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

एवढी आदळआपट आणि गदारोळ कशासाठी?

राजवर्धन नाईक निंबाळकर, गोकुळ दूध संघाने गेल्या ३५ वर्षांत पुण्यात स्वतःची पॅकिंग व्यवस्था का केली नाही? आता अशी स्वतःची पॅकिंग व्यवस्था निर्माण करीत असताना एवढी आदळपट आणि गदारोळ कशासाठी केला जातोय? याचे उत्तर तुमच्यासारख्या सुज्ञ व्यक्तीला समजायला हवे, असेही पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news