

कोल्हापूर : गेल्या साडेतीन वर्षांपासून रिक्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचा प्रसाद कुणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील मुख्यमंत्री निवडीच्या निर्णयाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता अंबाबाई मंदिराच्या कार्यभाराची जबाबदारी असलेल्या अध्यक्षपद निवडीच्या प्रक्रियेची दिशा स्पष्ट होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. त्यामुळे देवस्थानच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह जिल्हा बँक संचालक प्रताप माने यांच्यात या पदासाठी चुरस होण्याची शक्यता आहे.
2021 च्या एप्रिलमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली. सध्या समितीच्या प्रशासकीय अध्यक्षपदाची सूत्रे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे आहेत. राज्यातील महायुती सत्तास्थापनेनंतर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासह संचालक मंडळातील 6 रिक्त जागांवरही निवडीलाही वेग येणार आहे.
देवस्थान समितीचे मावळते अध्यक्ष महेश जाधव हे भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. भाजपमधील महत्त्वाच्या नेत्यांशी निकटचा संपर्क, अध्यक्षपदाचा अनुभव आणि भाजपचे सक्रिय नेते या त्रिसूत्रीचा फायदा महेश जाधव यांना होऊ शकतो. जाधव यांना राज्यस्तरीय राजकारणात स्वारस्य असल्याने ते अन्य महामंडळावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे भाजपकडून एखादी मोठी जबाबदारी मिळाली तर जाधव हे देवस्थान अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसतील. अन्यथा जाधव या स्पर्धेत आघाडीवर असतील.
कागल तालुक्यातील राजकारणाची जिल्हाच नव्हे तर राज्यातही मोठी पकड आहे. कागलचे माजी नगराध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने यांनीही देवस्थानच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा आहे. माने हे माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. सध्या महायुतीत अजित पवार गटाकडून मुश्रीफ यांचे वजन पाहता मुश्रीफ यांच्यामार्फत माने यांची देवस्थानच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ शिफारस होऊ शकते.
अध्यक्षपदासह अन्य सदस्यांसाठीही इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, माजी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, माजी सदस्य शिवाजी जाधव यांच्यासह धार्मिक क्षेत्राची जाण असलेल्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.