Tawde Hotel | तावडे हॉटेल परिसरातील ‘ती’ बांधकामे वाचविण्यामागे कुठली ‘अदृश्य शक्ती’?

महासभेत नगरसेवकांचा प्रशासनावर थेट हल्लाबोल; मिलीभगत सुरू असल्याचा गंभीर आरोप
Tawade Hotel area
Tawade Hotel
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरातील सामान्य भाजी विक्रेते, फेरीवाले आणि गोरगरिबांच्या पोटावर सहज वरवंटा फिरवणाऱ्या महापालिका प्रशासनाचे हात तावडे हॉटेल परिसरातील कोट्यवधींच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करताना का थरथरत आहेत? त्यामागे काय गौडबंगाल आहे? गरिबांना एक न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय, हा पक्षपातीपणा चालणार नाही. बेकायदेशीर बांधकामांना अभय देण्यामागे कोणती ‘अदृश्य शक्ती’ काम करत आहे?, अशा घणाघाती प्रश्नांची सरबत्ती करत संतप्त नगरसेवकांनी महासभेत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले.

तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून महासभेत जोरदार खडाजंगी झाली. हायकोर्टाच्या नावाखाली मिलीभगत केल्याचा प्रशासनावर थेट आरोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर रूपाराणी निकम होत्या. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड प्रमुख उपस्थित होते.

प्रशासनाची डोळेझाक का?

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी, तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील वादग्रस्त जागा महापालिकेच्याच हद्दीत असल्याचा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही प्रशासनाने डोळ्यांवर पट्टी का बांधली आहे? नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २२ जून रोजीच हा विषय महासभेपुढे मांडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, तब्बल तीन महिने उलटून गेले तरी हा विषय सभागृहापुढे आणला गेला नाही. हा थेट लोकप्रतिनिधींचा आणि महासभेचा अवमान आहे. एका ठरावीक बड्या वर्गाचे हित जपण्यासाठी हा राजकीय दबावतंत्राचा खेळ सुरू आहे. २०१८ नंतर न्यायालयाचा थेट अवमान करून या परिसरात अनेक बांधकामे झाली आहेत. ब्ल्यू लाईनमध्ये बांधकामे आहेत. त्या बांधकामांना न्यायालयाची स्थगिती नसताना प्रशासन डोळेझाक का करत आहे? महापालिकेची ही मिलीभगत आम्ही खपवून घेणार नाही, गरज पडल्यास या विरोधात आम्ही पुन्हा न्यायालयात दाद मागू, असा इशारा दिला.

...तर कोल्हापुरातील हजारो बांधकामे पाडावी लागतील

वातावरण तापल्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यात मोठा फरक आहे. सरकारी जागा आणि ओपन स्पेसवरील अतिक्रमणे काढता येतात. मात्र, तावडे हॉटेल परिसरातील जागा खासगी मालकीच्या आहेत. अशी कारवाई करायची झाल्यास संपूर्ण शहरातील हजारो बांधकामे पाडावी लागतील,‘ असा खुलासा त्यांनी केला. नगरसेवक विजेंद्र माने यांनी कारवाईला विरोध दर्शवला. ‘ या परिसरात उचगाव ग्रामपंचायतीच्या परवानगीने नागरिकांनी घरे बांधली आहेत, ती नियमित करावीत,’ अशी मागणी त्यांनी केली.

लवकरच पोस्टमाॅर्टम

सभागृह नेते मुरलीधर जाधव यांनी, शहरातील रस्त्यांप्रमाणेच गांधीनगर रोडवरील फूटपाथवरील सर्व अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी लावून धरली. आदिल फरास यांनी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे आमच्याकडे असून, याचे लवकरच पोस्टमाॅर्टम केले जाईल. महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी आयुक्तांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केला. दरम्यान, ​सभागृहातील प्रचंड गदारोळ आणि नगरसेवकांचा संताप पाहून महापौर निकम यांनी तावडे हॉटेल अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या गंभीर मुद्द्यावर लवकरच महापालिकेची ‘विशेष सभा’ घेऊ, असे निर्देश देऊन सभेतील वाद शांत केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news