

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांपैकी महत्त्वाच्या असलेल्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी या विभागाला पूर्णवेळ संचालकपदाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पाच वर्षांपूर्वी नियुक्त केलेल्या संचालकांनी राजीनामा दिल्याने सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने या पदासाठीची निवड प्रक्रिया गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्याने पद रिक्त आहे. तंत्रज्ञान विभागाला संचालक कधी मिळणार, याची चर्चा उच्च शिक्षण वर्तुळात सुरू आहे.
शिवाजी विद्यापीठात 2006 या वर्षी तंत्रज्ञान विभाग सुरू झाला. तर एम.टेक.चा अभ्यासक्रम 2008 यावर्षी सुरू झाला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी या विभागातील कोर्सेस उपयुक्त ठरत आहेत. सुरुवातीच्या सात वर्षांत या विभागाला पूर्णवेळ संचालकपद नेमण्यात आले नव्हते. तर 2015 ला पाच वर्षांसाठी पूर्णवेळ संचालकपदाची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 2020 पर्यंत पूर्णवेळ संचालकांच्या माध्यमातून विभागाचे कामकाज सुरू होते. त्यानंतर पुन्हा तंत्रज्ञान विभागात पाच वर्षांसाठी पूर्णवेळ संचालकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, अंतर्गत राजकारणामुळे संबंधित संचालकांनी दोन वर्षांतच राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा हे पद रिक्त झाले. रिक्त पदावर विद्यापीठाच्या वतीने तातडीने नव्या संचालकांनी निवड केली; मात्र त्यांनाही अंतर्गत राजकारणाचा फटका बसल्याची चर्चा झाली आणि त्यांनीही या पदाला रामराम ठोकला. त्यानंतर नियुक्त झालेल्या संचालकांनीही काही महिन्यांत राजीनामा दिला. चार वर्षांत दोन संचालकांनी पूर्णवेळ संचालकपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच पदमुक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या या पदाचा कार्यभार अतिरिक्त संचालकांकडे सोपवण्यात आला आहे.
सध्या अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्यासाठी गर्दी होत आहे. प्रवेश प्रक्रियेच्या काळात सध्या प्रभारी कार्यभार ज्यांच्याकडे आहे ते संचालक रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रजाकाळात अन्य प्रभारी संचालक नेमण्यात आले आहेत. आधीच तंत्रज्ञान विभागा प्रभारींच्या जबाबादारीवर सुरू असताना ऐन प्रवेशप्रक्रिया काळात प्रभारींच्या जागी दुसरे प्रभारी हा किल्ला लढवत आहेत.