

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा जोतिबाच्या पहिल्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 259.59 कोटींच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभही झाला. मात्र, त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचे काम कधी सुरू होणार, असा सवाल आता भाविकांतून केला जात आहे. हा आराखडा अद्याप प्रशासकीय मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्य मंत्रिमंडळाच्या चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे दि. 6 मे रोजी झालेल्या बैठकीत अंबाबाई मंदिर परिसराच्या 1445.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला तर श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 259.59 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यानंतर दि. 28 मे रोजी जोतिबा मंदिर परिसर विकासाच्या आराखड्याला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्याबरोबरच 147 कोटी रुपयांचा अष्टविनायक गणपती मंदिराचा विकास आराखडा, 1865 कोटींचा तुळजापूर येथील श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा, 681 कोटी रुपयांच्या चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळ जतन व संवर्धन विकास आराखडा आदींनाही प्रशासकीय मान्यता दिली. जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणीला प्रारंभ झाला. या आराखड्यात समावेश असलेल्या ‘दख्खन केदारण्य’ उभारणी कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन झाला. यानिमित्ताने एक प्रकारे आराखडा अंमलबजावणीचेच काम सुरू झाले. जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आठच दिवसांत अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यालाही प्रशासकीय मान्यतेचा आदेश निघेल, असे सांगितले होते. मात्र, आता जवळपास 20 दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी प्रशासकीय मान्यतेची प्रतिक्षा आहे.
अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यात भूसंपादनाचा मोठा प्रश्न आहे. भूसंपादन केल्यानंतर बाधितांना भरपाई कोणत्या स्वरूपात द्यायची याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. बाधितांना जागेच्या बदल्यात टीडीआर द्यायचा, रोख रक्कम द्यायची की पर्यायी जागा द्यायची यावर चर्चा सुरू आहे. भरपाईबाबत स्पष्टता निश्चित झाली की, आराखड्याला गती येईल असे सांगण्यात येत आहे.
अंबाबाई मंदिर आणि परिसरातील सर्व मंदिराचे संवर्धन होणार
स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांसाठी मंदिर परिसरातच स्वतंत्र व्यापारी संकुल उभारले जाणार
भाविकांचे दर्शन आरामदायी व्हावे याकरीता दर्शनमार्गही सुलभ आणि आकर्षक केला जाणार
ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात हेरिटेज प्लाझा उभारला जाणार
या परिसरात येणार्या भाविक, पर्यटकांना सुविधा उपलब्ध होणार
किरणोत्सवात येणारे सर्व अडथळे दूर केले जाणार
अच्छादित मंडपासह सुविधायुक्त दर्शन मार्ग होणार
दर्शन मंडपात भाविकांसाठी सर्व सुविधा देणार
स्थानिक व्यापार्यांसाठी संकुल
मंदिर परिसरातील दुकान गाळ्यांचे व्यवस्थापन
या परिसरातील भूसंपादन केले जाणार