kolhapur | ७०० कोटी लिटर्स इथेनाॅलचे करायचे तरी काय?

देशातील आणि राज्यातील साखर उद्योगांपुढे गहन प्रश्न : राज्यातील कारखान्यांची ९०० कोटींची गुंतवणूक अडचणीत
kolhapur |
kolhapur | ७०० कोटी लिटर्स इथेनाॅलचे करायचे तरी काय?
Published on: 
Updated on: 

सुनील कदम

कोल्हापूर : देशात आजघडीला जवळपास ७०० कोटी लिटर्स इथेनॉलचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. या अतिरिक्त इथेनॉलचे करायचे तरी काय, असा गहन प्रश्न देशातील आणि राज्यातील साखर कारखानदारीपुढे उभा राहिला आहे. अर्थातच, इथेनॉलच्या या अतिरिक्त उत्पादनाची सर्वाधिक झळ महाराष्ट्रालाच बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

उत्पा‍दन जादा, खप कमी

देशात उत्पा‍दित होणाऱ्या एकूण इथेनॉलपैकी १,१०० कोटी लिटर्स इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरले जाते. ३०० ते ३५० कोटी लिटर्स इथेनॉल दारू, विविध रसायने, औषधे आणि अन्य औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. इथेनॉलचा देशांतर्गत वापर यापेक्षा जादा होत नाही. याशिवाय, ३०० ते ३५० कोटी लिटर्स इथेनॉलची निर्यात होते. म्हणजे देशांतर्गत तयार होणाऱ्या २,४०० कोटी लिटर्स इथेनॉलपैकी जवळपास १,७०० ते १,८०० कोटी लिटर्स इथेनॉलचा उठाव होतो, तर जवळपास ७०० कोटी लिटर्स इथेनॉलला जगाच्या पाठीवर कुठे बाजारपेठच नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळेच देशातील आणि राज्यातील साखर कारखान्यांपुढे या अतिरिक्त इथेनॉलचे करायचे काय, हा सवाल उभा राहिला आहे.

महाराष्ट्राची अवस्था

राज्यातील १४० साखर कारखान्यांनी स्वत:चे इथेनॉल उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत. त्यासाठी या साखर कारखान्यांना जवळपास ९०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे; पण उत्पादित होणाऱ्या इथेनॉलला बाजारपेठच उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश साखर कारखान्यांना आपले इथेनॉल प्रकल्प पूर्णक्षमतेने चालविणे शक्य होत नाही. एकीकडे इथेनॉलला बाजारपेठ नाही आणि दुसरीकडे इथेनॉल प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढत चालला आहे, अशी साखर कारखान्यांची कोंडी झालेली आहे. पेट्रोलमध्ये सध्या मिसळण्यात येणाऱ्या २० टक्के इथेनॉलबद्दलच सध्या बऱ्याच तक्रारी आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनातील इथेनॉलचे प्रमाण वाढण्याबाबत अनिश्चितता आहे. हे प्रमाण वाढले तर किती वाढेल, याबाबतही अनिश्चितता आहे. त्यामुळे कारखानेही चिंतेत आहेत.

राज्यात ७१ टक्के इथेनॉल शिल्लक गेल्यावर्षी राज्याला जो इथेनॉलचा कोटा मिळाला होता, त्यापैकी साखर कारखान्यांच्या वाट्याला केवळ २९ टक्के इतकाच वाटा आला. साखर कारखान्यांनी उत्पादित केलेला इथेनॉलचा जवळपास ७१ टक्के साठा अजून शिल्लक आहे. त्यामुळे यंदा केंद्राकडून इथेनॉल उत्पादनाला परवानगी मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे. इथेनॉलला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे साखर कारखान्यांची ८०० ते ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक अडचणीत आली आहे. - पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news