

कोल्हापूर : मी महायुतीचाच हे सिद्ध करण्यासाठी आणखी कोणती परीक्षा द्यायची, असा सवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात राजकीय ॲडजेस्टमेंट असल्याच्या चर्चेबाबत विचारता आम्ही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत. तरीही ॲडजेस्टमेंटचे आरोप होत असतील तर आता सतेज पाटील यांच्यासोबत तलवार आणि ढाल घेऊन लढायचे काय, असाही सवाल केला.
गोकुळ निवडणुकीत महायुतीत भाजपला मोठ्या भावाचा मान दिला जाईल, भाजपचा कोणताही अपमान होणार नाही, असे सांगत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महायुती म्हणून आम्ही एकसंध आहोत. मात्र काही अदृश्य शक्ती छुपे कारनामे करत आहेत. हे कोण करत आहे, याचा शोध लागत नाही. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे मोठे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यावर भाष्य करणार नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.