

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेकडून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरालगतच्या ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीपोटी मुद्दल व विलंब आकारासह ८ कोटी ८० लाख ६३ हजार ४११ रुपयांची थकबाकी आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ५० टक्के थकीत मुद्दल न भरल्यास संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिला. उर्वरित २५ टक्के मुद्दल डिसेंबरअखेर, तर शेवटचे २५ टक्के मार्चअखेर भरण्याचे निर्देश त्यांनी दिले.
थकबाकी वसुलीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. एकूण थकबाकीमध्ये २ कोटी २१ लाख ९१ हजार २५६ रुपये मुद्दल, तर ६ कोटी ५८ लाख ७२ हजार १५५ रुपये विलंब आकार आहे. गेल्या १५ वर्षांपासून थकबाकी प्रलंबित असून, ग्रामपंचायतींकडून भरली जाणारी रक्कम विलंब आकारात जमा होत असल्याने मुद्दल कायम राहत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
गांधीनगरची सर्वाधिक थकबाकी
गांधीनगर ग्रामपंचायतीकडे ३ कोटी ३३ लाख ८४ हजार, हणमंतवाडी १ कोटी १८ लाख ८८ हजार, शिंगणापूर ८२ लाख ८९ हजार, कळंबा ७७ लाख ६२ हजार, वळिवडे ६० लाख ८३ हजार आणि गडमुडशिंगीकडे ५५ लाख ७६ हजार रुपयांची थकबाकी आहे. पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. बैठकीस उपायुक्त नागेंद्र मुतकेकर, संतोष जोशी, जयवंत उगले, जल अभियंता जयेश जाधव यांच्यासह संबंधित ग्रामपंचायतींचे अधिकारी उपस्थित होते.