

कोल्हापूर : पुईखडी सबस्टेशनच्या 33 केव्ही व 110 केव्ही मुख्य वीजवाहिनी मासिक देखभाल दुरुस्तीचे काम सोमवारी (दि. 6) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून होणार आहे. यामुळे पुईखडी सबस्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याने पाणी उपसा होणार नाही. परिणामी सोमवारी व मंगळवारी दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शहराला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करणार्या थेट पाईपलाईन योजनेच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम, अमृत-1 योजनेअंतर्गत बावडा फिल्टर नवीन पंप हाऊस येथील ग्रॅव्हिटी मेनच्या क्रॉस कनेक्शन व सुभाषनगर पंपिंग येथील नवीन रायझिंग मेनलाईन जोडण्याचे कामदेखील हाती घेतली आहे. या कामांनाही सोमवारीच सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी, ई वॉर्ड संलग्नित उपनगरे व ग्रामीण भागामध्ये दैनंदिन होणारा पाणीपुरवठा बंद राहील. बुधवारी (दि. 8) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
टंचाईच्या काळात महापालिकेकडून पाणी टँकरद्वारे दिले जाते. परंतु सध्या महापालिकेकडे केवळ तीन टँकर आहेत. काही खासगी टँकर चालकांशी करार करून टँकर भाड्याने घेतले आहेत. त्यामुळे या काळात 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.