

कासारवाडी, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पूलावर पाणी आल्याने प्रशासनाने हा पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. मागील दोन दिवस चांदोली-वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी (दि.21) झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर आल्याने निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावर पाणी आले. यामुळे प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूला बँरिकेटस लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
पूरसदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आहे. तहसीलदार कल्पना ढवळे, परीक्षाधीन तहसीलदार महेश खिलारे, पोलीस निरीक्षक विलास भोसले, मंडलाधिकारी अमित लाड, तलाठी शैलेश कुईंगडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष भापकर यांनी पूराची पाहणी करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूलमध्ये तयारी केली आहे. तसेच जनावरांसाठी वारणा दूध संघाच्या पोल्ट्री शेडमध्ये केलेले आहे.