kolhapur | 13 गावांच्या पाणीप्रश्नी ‘जीवन प्राधिकरणा’वर घागर मोर्चासह धडक; माजी आमदार ऋतुराज पाटील आक्रमक

संतप्त महिलांची घोषणाबाजी; अधिकार्‍यांना द्यावी लागली 27 जूनची लेखी मुदत
कोल्हापूर ः माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर गुरुवारी घागर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर ः माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर गुरुवारी घागर मोर्चा काढण्यात आला. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरालगतच्या 13 गावांतील महिलांनी गुरुवारी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही’, ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’ अशा जोरदार घोषणांनी ताराराणी चौक परिसरातील जीवन प्राधिकरण कार्यालयासमोरचा परिसर दणाणून गेला. पाचगाव, उचगाव, कळंबा, मोरेवाडीसह 13 गावांतील महिला डोक्यावर घागरी घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

मोर्चा जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर येताच संतप्त नागरिक, महिलांनी अधिकार्‍यांना घेराव घालत रखडलेल्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेबाबत जाब विचारला. यावेळी ऋतुराज पाटील यांनी अधिकार्‍यांवर प्रश्नांचा भडिमार केला. ठेकेदार मेघा इंजिनिअरिंग कंपनी सरकारचे जावई आहे काय? लोकांना गटारीचं पाणी प्यावं लागत आहे आणि अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत, योजना आम्ही मंजूर करून आणली, आता सरकार तुमचं आहे; मग काम का रखडलं? असा थेट सवाल करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ‘पाण्यात राजकारण आणू नका. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. लोकांना त्रास होत असेल तर आमच्यासारखे वाईट कोणी नाही’, असा दम अधिकार्‍यांना दिला. अखेर अधिकार्‍यांना 27 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागले.

सरकार बदलले आणि योजना रखडली

उचगाव, मुडशिंगी, गांधीनगर, वळीवडे, सरनोबतवाडी, कणेरी, गोकुळ शिरगावसह 13 गावांच्या पाणीप्रश्नासाठी 2022 मध्ये 343 कोटी रुपयांची गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि तत्कालीन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर ही योजना मुद्दाम रखडविल्याचा आरोप आंदोलकांपैकी संग्राम पाटील, मधुकर चव्हाण, युवराज गवळी यांच्यासह आंदोलकांनी केला.

आंदोलनात जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, संग्राम पाटील, शशिकांत खोत, प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील (चुयेकर), पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, शिल्पा हजारे, अनिता कांबळे, संगीता यादव सहभागी झाले.

अधिकार्‍याला पाण्याची आंघोळ

मोर्चादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकार्‍याच्या डोक्यावर पाण्याने भरलेली कळशी ओतून निषेध व्यक्त केला. काम मुद्दाम रेंगाळत ठेवल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. सरपंच निशांत पाटील, मयूर पाटील, दत्तात्रय पाटील, रोहन पाटील, राहुल शिंदे, तुषार देसाई यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

योजना पूर्ण करा; नारळ तुम्हीच फोडा

मंजुरी आम्ही आणली आहे. आता योजना पूर्ण झाली तर उद्घाटनाचा नारळ तुम्हीच फोडा. पण लोकांना पाण्यासाठी वणवण भटकायला लावू नका. महिलांच्या डोक्यावर घागरी आणि घराघरात पाण्याची टंचाई असताना प्रशासनाची ही उदासीनता सहन केली जाणार नाही, असे ऋतुराज पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news