Satej Patil | अध्‍यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांच्या नावाचे पाकीट दिले, तेव्हा मी जातीयवादी नव्हतो का?

आ. सतेज पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांना सवाल
Satej Patil
Satej Patil Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : ‘गोकुळ अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांच्या नावाचे पाकीट दिले होते, तेव्हा मी जातीयवादी नव्हतो का?’ असा सवाल आ. सतेज पाटील यांनी करून अध्यक्षपदावरून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला. मुश्रीफ यांनी जातीयवादी प्रचाराचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रत्युत्तर दिले.

आ. पाटील म्हणाले, मुश्रीफ यांनी ज्यांच्यावर बोलायला पाहिजे, त्यांच्यावर ते बोलत नाहीत. ज्यांनी त्रास दिला, त्यांच्याबद्दलही ते बोलत नाहीत. त्यांच्या मुलाला कोणी पाडले, हे त्यांनाही माहिती आहे, नवीद मुश्रीफ यांना कमी मते का मिळाली याची माहिती घ्‍या, असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांसाठी लढत असल्याचे सांगणाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहायला हवे होते. गोकुळ वाचला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आमच्याकडे बहुमत असल्याचे देशालाच नव्हे, तर जगाला माहिती आहे, असे आ. पाटील म्हणाले. निवडून आलेल्या संचालकांनी पुढील बैठकीला उपस्थित राहावे. शेतकर्‍यांनी विश्‍वासाने तुम्‍हाला संचालक केले आहे. सलग तीन बैठकींना अनुपस्थित राहिल्यास संचालकपद रद्द होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीतील घटक पक्ष कॅबिनेटवेळी एकत्र येतात. निवडणुकीत मात्र एकमेकांवर आरोप करतात. एकमेकांचे जमत नसेल तर शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेतून बाहेर पडावे. मुख्यमंत्र्यांनीही राज्‍यपालांना पत्र देऊन शिवसेना, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍याची गरज नाही हे सांगावे, असेही आमदार पाटील म्‍हणाले. राज्‍यात पदवीधरचे निकाल चांगले आले. महायुतीविरोधात पदवीधरांचा रोष आहे, हे पदवीधर निवडणुकीत स्‍पष्‍ट झाले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात कमी पडलो त्‍याचे आत्‍मचिंतन करू. नागपूरची जागा मुख्‍यमंत्र्यांनी प्रतिष्‍ठेची करूनही विजय मिळाला नाही. पुणे पदवीधरची जागा मतदारसंघात दहा मंत्री असूनही भाजपला गमवावी लागली. सर्वसाधारण निवडणुकीत महायुती विरोधात रोष असल्‍याचे सिद्ध झाले आहे. शेकापचे माजी आमदार जयंत पाटील म्हणाले, सहकारातील अशा पद्धतीने केलेला कारभार कोल्हापूरची जनता खपवून घेणार नाही. कोल्हापूरचा टोल घालविलेली जनता याबाबतही जनक्षोभ करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

महायुतीच्‍या नेत्‍यांना शेतकरी, गोकुळच्‍या हितापेक्षा सत्ता महत्त्वाची

मुश्रीफ हे सत्तेतील नेते असल्याने आपल्याला आव्हान देऊ शकतात; मात्र विरोधी संचालकांनी पुढील बैठकीला उपस्थित राहावे, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, विरोधी संचालकांची बैठकीस उपस्‍थित राहण्‍याची मानसिकता आहे. मात्र नेत्‍यांच्‍यापुढे जाता येत नसल्‍याने ते येऊ शकत नाहीत. महायुतीच्‍या नेत्‍यांना शेतकरी आणि गोकुळ दूध संघाच्‍या हितापेक्षा सत्ता महत्त्वाची वाटते, असा टोलाही पाटील यांनी लगावला. स्वीकृत सदस्‍य वाढवून त्‍यांना मताचा अधिकार देण्‍याचा प्रकार योग्‍य नाही. जनता हे मान्‍य करणार नाही. लोकांचा जनक्षोभ होईल, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.