

कोल्हापूर : राजारामपुरी येथील मध्यवर्ती शाहू मिल चौक-कोटीतीर्थ तलाव रोडवर झालेल्या भीषण अपघातातील मोटारचालक मयुरेश योगेश पाटील (वय 19, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) हा नशेत होता का, हे फॉरेन्सिक तपासणीतून स्पष्ट होणार आहे. तपासाधिकार्यांनी चालकाचे रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. रिक्षाचालकासह पाच प्रत्यक्षदर्शींचेही सोमवारी जबाब घेण्यात आले आहेत. संबंधितांना साक्षीदार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अपघाताचे निश्चित कारण पुढे येण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक सतीश होडगर, सहायक निरीक्षक भारत साळुंखे यांच्याकडून सोमवारी सकाळी तपासाचा आढावा घेतला. फॉरेन्सिक तपासणी अहवालानंतर चालक मयुरेश पाटील नशेत होता की काय, हे स्पष्ट होणार असल्याचेही सहायक निरीक्षक साळुंखे यांनी सांगितले.
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मोटारचालक मयुरेश पाटील याचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले आहेत. शासकीय रुग्णालयाच्या अधिकार्याकडून एक-दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होणार असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय फॉरेन्सिक लॅबकडेही नमुने सादर करण्यात आले आहेत. दोन्हीही तपासणीतून चालकाने भीषण अपघातापूर्वी मद्यप्राशन केले होते का, रक्तात त्याचा अंश होता का, हेदेखील स्पष्ट होणार असल्याचे तपासाधिकार्यांनी सांगितले. मयुरेश पाटील याने जनता बाजार चौकात एका रिक्षा चालकाला धडक दिली होती. संबंधित रिक्षा चालकासह मृत आणि जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविणार्या तरुणांसह प्रत्यक्ष घटना पाहणार्या एकूण पाच जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. शिवाय सीसीटीव्ही फुटेजद्वारेही आणखी काही साक्षीदारांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष घटना पाहणार्या नागरिकांनी तपास प्रक्रियेत पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी केले आहे.
मयुरेशच्या वडिलांसह कुटुंबीयांना धक्का
चालक मयुरेश पाटील याचे वडील योगेश पाटील यांचाही पोलिसांनी जबाब घेतला आहे. दहा मिनिटांत येतो, असे सांगून मयुरेश शनिवारी दुपारी 3 वाजता मोटारीसह बाहेर पडला होता. त्यानंतर काही काळाने भीषण दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेने योगेश पाटील यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे, असेही सांगण्यात आले.