

वारणानगर : देशात दुग्धजन्य पदार्थ उत्पादनात ‘वारणा ब्रँड’ चा दबदबा निर्माण करत वारणा खोर्यातील शेतकर्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणार्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य ठरलेल्या श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची (वारणा दूध संघ) पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली, तर सलग आठव्यांदा निवडणूक बिनविरोध झाल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.
देशात दुग्ध क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सलग 8 व्यांदा बिनविरोध पार पडली. सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 21 अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध संचालक मंडळ निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली.
वारसा आणि कर्तृत्व यांचा मेळ घालत नव्या संचालक मंडळात 5 नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. वारणा परिसरात गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करताना विनय कोरे म्हणाले, ‘वारणा समूहाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा महाराष्ट्र राज्यात आदर्शवत आहे. वारणा समूहाच्या वाटचालीत सहकार शक्तीचा पाया भक्कम आणि आदर्शवत आहे. सभासदांनी दाखवलेला हा विश्वास आम्हाला दूध उत्पादकांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देतो.’ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे व सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूरचे प्रदीप मालगावे, संस्थेच्या वतीने कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण शेलार, सचिन माने आदींनी काम पाहिले.
बिनविरोध संचालक मंडळ असे :
‘अ’ वर्ग उत्पादक सभासद गट
विनय विलासराव कोरे (वारणानगर),
शिवाजी रामचंद्र कापरे (कोडोली),
अभिजित शिवाजीराव पाटील (चिकुर्डे),
नेमगोंडा रायगोंडा पाटील (किणी),
प्रदीप राजाराम देशमुख (नवे पारगाव),
राजवर्धन हंबीरराव मोहिते (घुणकी),
महेंद्र बजरंग शिंदे (वाठार तर्फे वडगाव),
दीपकराव आनंदराव पाटील (खोची),
कृष्णा रामचंद्र पाटील (केखले),
अधिकराव ज्ञानू पाटील (कोरेगाव),
विश्वास शंकर पायमल (आरळे),
सागर सर्जेराव पाटील (कांदे),
संजय अण्णासो देसाई (मिणचे).
‘ब’ वर्ग संस्था सभासद गट
अरुण बाबासाहेब पाटील (कुंभोज),
लालासो आनंदराव पाटील (तांदूळवाडी).
‘क’ वर्ग सभासद गट
हिंदुराव रंगराव जाधव (बहिरेवाडी),
माधव प्रभाकर गुळवणी (तळसंदे).
अनुसूचित जाती/जमाती
शिवाजी महादेव जंगम (जाखले)
डॉ. मिलिंद विठ्ठल हिरवे (माले).
महिला प्रतिनिधी
नाजीया तबरेज मुल्ला (कोडोली).
तेजस्विनी सुनील पाटील (लाडेगाव).