

Warana Dam water level update
बांबवडे: वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि जलाशयाची पातळी नियंत्रित करण्यासाठी, आज (रविवार) सकाळी ६ वाजता धरणातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकूण १३,५३० क्युसेक, यामध्ये वक्र दरवाजांमधून ११,९०० क्युसेक, विद्युतगृहातून १,६३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणातील पाण्याची आवक वाढत गेल्यास, परिस्थितीनुसार विसर्गाचे प्रमाण आणखी वाढवले जाऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मोठ्या विसर्गामुळे वारणा नदीने आपले पात्र ओलांडले असून, पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरण्यास सुरुवात झाली आहे. शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. नदीवरील अनेक लहान पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक विस्कळीत झाली असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. शेती आणि नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, महसूल आणि पोलीस प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, आपली गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.