कोल्हापूर : वाघापूर (ता. भुदरगड) येथील सपाटीकरण केलेल्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान उभारावी, या मागणीसाठी दलित समाजाने दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला. शुक्रवारी याबाबत बोलवलेल्या बैठकीतही तोडगा न निघाल्याने आता मुंबईला लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेत, सायंकाळी आंदोलक मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाले.
वाघापूर येथील गट क्रमांक 2 मध्ये 39 गुंठे जागा आहे. यातील 3 गुंठे जागा समाजाच्या स्मशानभूमीसाठी तर 9 गुंटे प्रचलित तलावासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यातील 27 गुंठे पड क्षेत्र 7/12 उतार्यावर नोंद आहे. ग्रामपंचायतीकडून याच जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू असताना त्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभी करण्याचा ग्रामसभेत 26 जानेवारी 2004 ला ठराव मंजूर झाला. या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी वाघापूरच्या दलित समाजाने वाघापूर ते नागपूर असा लाँग मार्च काढला होता.
तो बुधवारी सांयकाळी कोल्हापुरात आल्यानंतर आंदोलकांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शुक्रवारीही दिवसभर आंदोलक कार्यालयाबाहेर ठाण मांडून होते. गुरुवारी बैठकीत निर्णय न झाल्याने आज पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी येडगे यांनी ग्रामस्थांनाही बोलवले होते. गावातला दाद गावात मिटू दे म्हणून आंदोलक व गावातील प्रमुख नेत्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.त्यात दोन कमानी उभ्या करूया सर्व महापुरुषांची नावे देण्याबाबतही चर्चा झाली. मात्र कमान पुढे की मागे याचाबत कोणतेही एकमत झाले नाही.बैठकीत कोणताही निर्णय न झाल्यामुळे मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार करत सायंकाळी आंदोलक घोषणा देत पायी रवाना झाले. टोप येथे मुक्काम करून शनिवारी सकाळी मुंबईच्या दिशेने ते मार्गस्थ होणार आहेत.
दरम्यान दिवसभर या आंदोलनात विविध संघटनाचे पदाधिकारी उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, सुभाष देसाई, सदानंद डिगे, अविनाश कांबळे, दगडू भास्कर, बबन कांबळे, अशोक कांबळे, सातापा कांबळे, नेताजी कांबळे, नामदेव कांबळे, सागर कांबळे, निकाजी कांबळे, महाबोधी पद्माकर, अरुण सोनवणे ,आकाश कांबळे, अमित नागटिळे, जे. के. गायकवाड, नितीन कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
पोलिसांचे चांगले नियोजन
दरम्यान गुरूवारी रात्री तसेच शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी आंदोलकांसाठी नियोजन केले. रात्री मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद केली. झोपण्यासाठी जमखान्यांची व्यवस्था केली.फिरते स्वच्छतागृह, रुग्णवाहिका तैनात केल्या. शुक्रवारीही आंदोलकांना एका बाजूला घेत, दुसर्या बाजूने वाहतूकही सुरळीत सुरू ठेवली. गुरूवारी रात्री जेवण रस्त्यावर न करता बाजूला करावे यावरून किरकोळ वाद झाला. मात्र, शेगडीवर पाय मारण्यासारखा कोणताही प्रकार झाला नाही, गैरसमजूतीने कोणीतरी ही माहिती दिल्याचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी सांगितले.