

धीरज बरगे
कोल्हापूर : जिल्ह्यातील 239 प्राथमिक दूध संस्था गोकुळच्या निवडणुकीत मतदानाला मुकण्याची शक्यता आहे. 164 दूध संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून अद्याप निवडणूक झालेली नाही; तर 75 संस्थांची नोंदणी रद्द झाली आहे. नोंदणी रद्द झालेल्या बहुतांश संस्था गोकुळशी संलग्न आहेत. त्यामुळे 200 पेक्षा जास्त संस्था मतदानाला मुकण्याची शक्यता आहे. सध्या निवडणूक प्रलंबित राहिलेल्या दूध संस्थांकडून प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी घाई सुरू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्याने सहकारी संस्था निवडणुकीची स्थगिती मंगळवारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उठवली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित 624 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. गोकुळच्या संचालक मंडळाचीही मुदत मे 2026 मध्ये संपणार असल्याने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गोकुळकडे प्रारूप मतदार यादी मागविण्यात आली आहे.
कोरोनाकाळात सुमारे दोन वर्षे सर्व प्रकारच्या निवडणुका ठप्प होत्या. या काळात जिल्ह्यातील सुमारे 1810 दूध संस्थांच्या निवडणुका प्रलंबित राहिल्या. 2021 मध्ये निवडणुकांवरील स्थगिती उठल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीला सुरुवात झाली. प्रलंबित 1,810 पैकी 1,273 संस्थांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली; तर 537 संस्थांकडून प्रारूप मतदार यादी देण्यास टाळाटाळ सुरू होती. त्यामुळे सहायक उपनिबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी मतदार यादी देण्यास टाळाटाळ करणार्या दूध संस्थांना प्रशासकाची नेमणूक करण्याबाबत नोटीस बजावली. यानंतर 373 संस्थांची निवडणूक झाली, तर अद्याप 164 दूध संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या संस्थांवर संचालक मंडळ नसल्याने यापैकी गोकुळकडे संस्था सभासद असणार्या दूध संस्थांना मतदान करता येणार नाही.
75 संस्थांची नोंदणी रद्द
जिल्ह्यातील 75 प्राथमिक दूध संस्थांची नोंदणी रद्द झाली. त्यामुळे यामधील गोकुळकडे सभासद असणार्या संस्थांना निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या संस्थांचे मतदान कमी होणार हे निश्चित आहे. यामध्ये शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक 14 संस्थांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी यंत्रणा गतिमान
निवडणूक प्रलंबित असलेल्या दूध संस्थांची माहिती घेण्याचे काम नेत्यांच्या यंत्रणेकडून सुरू आहे. निवडणूक प्रलंबित असलेल्या संस्थांपैकी आपल्या गटाशी संबंधित संस्था कोणती आहे, याची माहिती घेऊन त्या संस्थेची निवडणूक पूर्ण करून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे.