Zilla Parishad Election | प्रचार थंडावला!

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उद्या मतदान; आज साहित्य वाटप
Zilla Parishad Election |
kolhapur Zilla Parishad Election | प्रचार थंडावला!
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून धडाडणार्‍या प्रचाराच्या तोफा गुरुवारी रात्री दहा वाजता थंडावल्या. उमेदवारांनी अखेरच्या दिवशीही जाहीर सभा, प्रचार रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जाहीर प्रचार संपताच छुप्या प्रचाराला वेग आला. वैयक्तिक गाठीभेटीसह जोडण्यांसाठी उमेदवार, कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लागली. प्रतिस्पर्धी उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर एकमेकांचा खडा पहारा सुरू झाला.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शनिवारी (दि. 7) मतदान होत आहे. यासाठी शुक्रवारी (दि. 6) मतदान साहित्यांसह मतदान कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होणार आहेत. शनिवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे मतदानाच्या 48 तास अगोदर जाहीर प्रचाराची सांगता झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रचाराचा अक्षरश: धुरळा उडला होता. याच दरम्यान 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. पवार यांच्या निधनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. यामुळे काही उमेदवारांच्या प्रचारावर मर्यादा आली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मतदान दोन दिवस पुढे ढकलले. यामुळे उमेदवार, कार्यकर्त्यांना प्रचारासाठी आणखी दोन दिवस जादा मिळाले.

अखेरच्या तीन-चार दिवसांत राजकीय पक्षाचे नेते, उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला अक्षरश: भिंगरी बांधली होती. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचताना सार्‍यांचीच दमछाक होत होती. त्यानुसार वेगवेगळ्या भागात प्रचाराचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका असे नागरी भाग वगळता बहुतांश सर्वच भाग गेले दोन-तीन दिवस तर प्रचाराने ढवळून गेला होता. अखेरच्या टप्प्यात जाहीर सभा, प्रचार फेर्‍या, कार्नर सभा यामधून एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले. त्यातून निवडणुकीतील चुरस वाढत जाऊन प्रत्येक मतदार संघातील ईर्ष्याही टोकाला गेली.

गुरुवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच प्रचाराला उधाण आले होते. राजकीय नेते, उमेदवार, त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्त्यांनी सकाळी सात-आठ वाजल्यापासूनच प्रचारासाठी बाहेर पडले होते. वाटेतच नाश्ता, जेवणाचा आस्वाद घेत, जास्तीत जास्त वेळ, अधिकाधिक मतदारांसमोर जाण्यासाठी देत, रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू होता. काही उमेदवारांनी मोटारसायकल रॅली, काहींनी प्रचार फेरी तर काहींनी सायंकाळनंतर जाहीर सभा आयोजित करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत जाहीर प्रचाराची सांगता केली.

शनिवारी मतदान; सोमवारी मतमोजणी

जिल्हा परिषदेच्या 68 तर पंचायत समितीच्या 136 मतदारसंघांसाठी शनिवारी (दि. 7) मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी शुक्रवारी सकाळी मतदान कर्मचारी व साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना होणार आहे. सोमवारी (दि. 9) मतमोजणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news