

कोल्हापूर : राज्यात लवकरच मतदार याद्यांचा विशेष फेरपरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) सुरू होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. फेबुवारी 2026 पासून या कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांची पडताळणी सुरू होईल, अशी शक्यता आहे.
देशातील विविध भागांत मतदार यादीतील नोंदीबाबत विरोधी पक्षाने आक्षेप घेतले आहेत. मतदार याद्यांत घोळ झाल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील नऊ राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
निवडणूक आयोगाच्या हालचाली
राज्यातही मतदार याद्यांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. यामुळे जानेवारीअखेर या निवडणुकांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातही विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरू आहेत.
या मतदार याद्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सर्व जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार आदींच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत या बैठका होणार होत्या. मात्र त्या काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या बैठका जानेवारी महिन्यात होतील आणि फेबुवारीपासून हा कार्यक्रम राज्यात सुरू होईल, अशी शक्यता आहे
विभागनिहाय बैठका
मतदार याद्या पडताळणीसाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा विभागनिहाय बैठका होणार आहेत. या बैठकांत मतदार याद्या पडताळणीबाबतचा आढावा घेण्याबरोबरच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सद्य:स्थिती आणि त्यांचे प्रशिक्षण, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण यांचाही आढावा घेतला जाईल.
2025 आणि 2002 च्या मतदार याद्यांचे होणार मॅपिंग
पडताळणीत 2025 च्या मतदार यादीतील मतदारांचे 2002 च्या मतदार यादीतील मतदारांच्या नावांशी मॅपिंग केले जाणार आहे. यासह 100 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. त्यादृष्टीने अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे.