

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार जसजसा वेग घेत आहे, तसतसे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. निवडणूकपूर्व बहुतांशी प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, काही इच्छुक उमेदवारांच्या मोबाईलमध्ये मतदारांच्या छायाचित्रांसह मतदार यादी असलेले अनधिकृत अॅप उपलब्ध असल्याचे ठिकठिकाणी आढळून येत असल्याची चर्चा सुरू आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून मतदारांच्या छायाचित्रांचा गैरवापर होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार छायाचित्र नसलेली मतदार यादीच महापालिका व निवडणूक कार्यालयामार्फत उमेदवारांना देण्यात आली आहे. मात्र, याउलट काही इच्छुक उमेदवारांकडे मतदारांचे रंगीत छायाचित्र असलेली यादी मोबाईल अॅपच्या माध्यमातून उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
ही माहिती इच्छुक उमेदवारांपर्यंत कशी पोहोचली, हा डेटा कोठून मिळवण्यात आला आणि कोणाच्या परवानगीने अशा अॅपचा वापर केला जात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही खासगी सॉफ्टवेअर कंपन्यांनी अशा प्रकारची अॅप तयार करून ती इच्छुक उमेदवारांना विकल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे काही कंपन्या या बेकायदेशीर व्यवहारातून मालामाल झाल्याचेही बोलले जात आहे.
मतदारांच्या छायाचित्रांसह याद्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे निवडणूक आयोग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून, अशा अनधिकृत अॅपचा वापर करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना
मतदार यादी प्रकाशित करताना छायाचित्रांचा समावेश करू नये.
प्रारूप, अंतिम किंवा मतदान केंद्रनिहाय यादी फोटोशिवायच प्रसिद्ध करणे बंधनकारक.
कृष्णधवल छापील मतदार यादी विक्रीसाठी मुभा.
रंगीत छायाचित्र असलेल्या याद्या उपलब्ध होणे हा नियमांचा स्पष्ट भंग.
कायद्याच्या चौकटीत छायाचित्रांचा वापर
वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023 व सायबर कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची खासगी माहिती किंवा छायाचित्रे त्यांच्या संमतीशिवाय सार्वजनिक करणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचा वापर सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत येतो. छायाचित्रांचा गैरवापर करून त्रास देणे, धमकावणे किंवा दबाव आणणे हे सायबर छळवणुकीचे प्रकार मानले जातात.