Pattan Kodoli Yatra | पट्टणकोडोलीत विठ्ठल-बिरदेव यात्रेस प्रारंभ

‘बिरोबाच्या नावानं चांगभलं...’चा अखंड जयघोष; उसळला भक्तीचा महासागर
पट्टणकोडोली : ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं..’चा अखंड जयघोष करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. मंदिराचा परिसर असा भंडार्‍यामध्ये न्हाऊन निघाला. ड्रोनद्वारे घेतलेले छायाचित्र.
पट्टणकोडोली : ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं..’चा अखंड जयघोष करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. मंदिराचा परिसर असा भंडार्‍यामध्ये न्हाऊन निघाला. ड्रोनद्वारे घेतलेले छायाचित्र. (छाया : सरफराज हेरवाडे)
Published on: 
Updated on: 

शिरीष आवटे

पट्टणकोडोली : ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं...’ च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. पारंपरिक पद्धतीने साजर्‍या होणार्‍या यात्रेत धनगर समाजबांधवांचे सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडते.

कोजागिरी पौर्णिमेच्या मृग नक्षत्रावर भरणार्‍या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यांतून लाखो भाविक दाखल झाले आहेत. अंजनगाव येथील महाराज खेलोबा नानादेव वाघमोडे (फरांडेबाबा) यांनी भाकणूक कथन केली. भाकणुकीच्या मुख्य दिवशी मानकरी, प्रकाश पाटील, रणजित पाटील, देवस्थानचे मानकरी, गावकरी यांनी मानाच्या तलवारीचे पूजन केले. त्यानंतर फरांडेबाबांची भेट घेऊन श्री विठ्ठल-बिरदेवाच्या दर्शनासाठी येण्याची विनंती केली. नानादेव मंदिराच्या गाभार्‍यासमोरील मानाच्या गादीवरून उठून हेडा नृत्य करीत दर्शनासाठी गेले. यावेळी भाविकांनी भंडार्‍याची उधळण केली. गळाभेट व हेडाम नृत्य सोहळा करीत फरांडे बाबा मंदिरात आले. भाकणूक ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त मंदिर परिसरात उपस्थित होते. यात्रा काळामध्ये घोंगड्यांची उलाढाल लाखो रुपयांचे होते.

भाकणुकीच्या सोहळ्यात भंडार्‍याला विशेष महत्त्व असल्याने श्री विठ्ठल-बिरदेव देवस्थान समितीच्या वतीने सुमारे ५० टन भंडार्‍याची आवक करण्यात आली आहे. गावातील विविध दुकानांसह मंदिर परिसरात अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. याशिवाय खारीक, बांगड्या, मेवा-मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांची दुकाने व गाड्या यात्रेत दाखल झाल्या आहेत. भाविकांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळण्यांसह विविध करमणुकीचे खेळही आले आहेत. दरम्यान, यावर्षी फरांडेबाबांच्या भाकणुकीच्यावेळी हेलिकॉप्टरमधून भंडार्‍याची उधळण करण्यात आली. या अनोख्या सोहळ्याचा भाविकांनी आनंद घेतला. यात्रेनिमित्त मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकाशराव शेंडगे, विद्याताई मोटे, देवस्थान कमिटीच्या सचिव वर्षा साळुंखे, दीपक बोर्‍हाटे, लक्ष्मण हाके, आ. अशोकराव माने, सुहास राजमाने, राजेंद्र हुपरे यांच्यासह प्रशासन, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन घेतले.

फरांडेबाबांची भाकणूक

पर्जन्य : सात दिवसांत पाऊस पडेल.

धारण : दोन-सव्वादोन, अडीच-साडेतीन मन मानेल तसे.

रसभांडे : मिरची, साखर महागाई वाढेल.

राजकीय : राजकारणात अनेक ठिकाणी पूर्ण गोंधळ माजेल.

कांबळा : जो माझ्या गुरूचे चरण धरेल त्याच्यावर मी कांबळ्याची छाया धरेन, मेंढका होऊन राखण करेन.

कडधान्य : कडधान्य महाग होईल.

सोने-चांदी : कडकडाट होईल.

पुढचा पेरा : रोहिणीचा पाऊस, मिरगाचा पेरा सगळीकडे होईल.

देवाची भक्ती : सर्व वातावरण भक्तिमय होईल.

विज्ञान संशोधन : जगात अनेक ठिकाणी नवीन संशोधन होतील, या संशोधनामुळे मानवी जीवनास त्रास होईल.

देश-विदेश : देश-विदेशात अनेक आंदोलने होऊन राजकीय उलथापालथ होईल व मोठ्या लढाया होतील.

लोकसंख्या : जगभरात लोकसंख्या प्रचंड वाढेल व देशावर महिला राज्य करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.