Vishwaprabha Patsanstha Scam | विश्वप्रभा पतसंस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करा

ठेवी मिळत नसल्याने ठेवीदारांची पत्रकार परिषदेत मागणी
scam
scamPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : विश्वप्रभा नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांना ठेवी परत दिल्या जात नाहीत. पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचे उघड होऊनही सहकार विभागाकडून योग्य ती कार्यवाही होत नाही. यामुळे पतसंस्थेतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी सहकार सचिवांकडे केल्याची माहिती ठेवीदार बी. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विश्वप्रभा पतसंस्थेत सुमारे १७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ९ कोटी ३६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. सध्या ठेवीदारांना ठेवी परत मिळत नाहीत. लेखा परिक्षण अहवालात संस्थेत अपहार, गैरव्यवहार समोर आल्याचे समजते. यासंदर्भातील अहवाल तयार असूनही सहकार विभागाकडून योग्य ती कार्यवाही होत नाही, असे सांगून बी. के. पाटील म्हणाले, संस्थेत ८ हजार ४८१ ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. संस्थेचे संस्थापक राजेंद्र शेटे व त्यांच्या नातलगांचा संस्थेच्या कारभारावर प्रभाव होता. वैयक्तिक व्यवसायाशी संबंधित व्यवहारासाठी संस्थेचा वापर झाला का? संस्थेच्या परवानगीशिवाय ओव्हरड्राफ्टद्वारे त्या खात्यातून व्यवहार झाले का? आणि ते व्यवहार संस्थेच्या पुस्तकामध्ये का दाखवले गेले नाहीत, याची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संचालकांच्या पत्रव्यवहारानुसार काही कर्मचारी व व्यवस्थापकांनी स्टॅम्पवर आर्थिक अपहारासंबंधी कबुली जबाब दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींना संस्थेच्या कारभारापासून दूर करून रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याऐवजी त्यांच्याकडून काम करून घेतले जाते हे गंभीर आहे, असे ते म्हणाले.

संस्थेच्या लेखापरीक्षकांनी २०२३-२४ व २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालात ७ कोटी ९८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार ठेवीदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे, सहकार आयुक्त, सहकार सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आदींकडे यासंदर्भात दाद मागितली आहे. मात्र, सहकार विभागाकडून एफआयआर दाखल करण्याबाबत व जबाबदार व्यक्तींवर तातडीची कारवाई करून मालमत्ता जप्ती किंवा ठेवीदारांचे पैसे सुरक्षित करण्यासाठी परिणामकारक पावले उचलली जात नाहीत, याची वरिष्ठांनी दखल घ्यावी, असेही त्यांनी सहकार सचिवांकडे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. पत्रकार परिषदेला संभाजी पाटील, धोंडिराम मंगोसीस, डॉ. युवराज हेर्लेकर आदी उपस्थित होेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news