

विशाळगड : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या विशाळगड येथील हजरत पीर मलिक रेहान मिरासाहेब बाबांचा उरूस रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक धार्मिक विधींच्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा झाला. 'मलिक रेहान बाबा की दोस्तानो धीन...' च्या अखंड निनादाने संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला होता.
गलेफ मिरवणुकीने उरुसाची सांगता
तीन दिवस चाललेल्या या उरुसाच्या मुख्य दिवशी, रविवारी दुपारी साडेचार वाजता ढोल-ताशांच्या गजरात गलेफ मिरवणूक काढण्यात आली. चंदन, गुलाब पाणी आणि उंची अत्तराने सुवासित केलेला गलेफ मुजावर मंडळी, मुंबई व राजापूर येथील मानकरी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते मिरवणुकीने चाँदसाहेब इमारतीत नेण्यात आला. या मिरवणुकीत भाविकांनी सादर केलेली चित्तथरारक युद्धकला आणि अंगावर शस्त्रे मारून घेण्याचे साहसी प्रकार उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.
धार्मिक विधी आणि परंपरा
दर्गा पुजारी फरीद मुजावर यांच्या हस्ते बाबांच्या तुर्बतीला संदल आणि फुलांच्या चादरी अर्पण करण्यात आल्या. चाँदसाहेब इमारतीत रज्जाक मुजावर यांनी धार्मिक विधी पार पाडले, त्यानंतर भाविकांना 'चंदन' वाटण्यात आले. तत्पूर्वी, पहिल्या दिवशी पोथी पठण आणि दुसऱ्या दिवशी 'गंधरात्र' उत्साहात साजरी झाली.
उरूस काळात प्रत्येक रात्री आपोआप कुलूपबंद दरवाजा उघडतो, अशी भविकांची श्रद्धा आहे. पहिल्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता, दुसऱ्या दिवशी ४.४० वाजता दरवाजा उघडला. हे पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर भाविकांची गर्दी केली असली तरी प्रशासकीय निर्बंधांमुळे रात्री गडावर शुकशुकाट कायम आहे.
प्रशासकीय नियोजन आणि शिस्त
यंदा वन विभागाने पर्यावरणाचे रक्षण आणि अतिक्रमण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादले होते. मुख्य कमानीच्या आत वाहनांना प्रवेशबंदी केल्यामुळे पायथ्यापासून एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शाहूवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता, तर आंबा आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. या सोहळ्यासाठी केंबुर्णेवाडी तपास नाक्यावर भाविकांचा महापूर लोटला होता.