

सरूड : विशाळगड- गजापूर दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि समस्त हिंदू बांधव महाराष्ट्र राज्य संघटनेचा संस्थापक-अध्यक्ष रवींद्र दिलीप पडवळ (रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (दि. 2) वाढ करण्यात आली. पडवळ तपासात सहकार्य करत नसल्याचे कारण पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवल्यानंतर शाहूवाडी-मलकापूर प्रथम वर्ग न्यायालयाने हा आदेश दिला.
दंगलीच्या घटनेनंतर तब्बल 13 महिने फरार असलेल्या पडवळला शाहूवाडी पोलिसांनी 26 ऑगस्टला रात्री पुण्यातून अटक केली होती. त्याला 27 रोजी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत शनिवारी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी संशयित आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याची बाब पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दंगलीच्या कटामागे आणखी कोण आहे, याचा सखोल तपास करण्यासाठी कोठडी वाढवून देण्याची विनंती पोलिसांनी केली.
न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करून पडवळच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, पडवळ फरार असताना कोल्हापूर जिल्ह्यातील एका धार्मिक कार्यक्रमात वावरत असल्याचा त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी हडपसर परिसरात पाच दिवस तळ ठोकून त्याला जेरबंद केले होते. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.