Vishalgad Urus News | विशाळगडावर मलीक रेहान उरुसाची 31 मे रोजी सांगता!

​गड भाविकांनी फुलला, सर्वत्र अभूतपूर्व उत्साह
विशाळगड उरुसासाठी भाविकांची केंबुर्णेवाडी नाक्यावर झालेली  गर्दी.
विशाळगड उरुसासाठी भाविकांची केंबुर्णेवाडी नाक्यावर झालेली गर्दी.
Published on
Updated on

विशाळगड : ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या हजरत पीर मलीक रेहान बाबांच्या वार्षिक उरुसाचा रविवारी भक्तिमय वातावरणात समारोप होत आहे. दर्गा पुजारी फरीद मुजावर यांच्या हस्ते दर्ग्यातील सर्व विधी पार पडत आहेत. २९ मे पासून सुरू झालेल्या या त्रिदिनात्मक सोहळ्याने गडावर चैतन्याचे उधाण आले असून, रविवारी पारंपरिक 'गलेफ' मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे.

​उरुसाच्या पहिल्या दिवसापासूनच दर्ग्यात धार्मिक विधींचा गजर सुरू होता. तुरबतीला चुना अर्पण करणे, सुगंधी चंदनविलेपन आणि पोथी पठणाने गडाचा परिसर भक्तीने न्हाऊन निघाला. शनिवारी 'गंधरात्र' उत्साहात साजरी झाल्यानंतर, रविवारी मुख्य दिवशी चांद इमारतीत इम्रान मुजावर यांच्या हस्ते बाबांच्या समाधीवर मानाचे गलेफ चढवले जाणार आहे.

दर्ग्यावर विद्युत रोषणाई केल्याने विद्युत रोषणाईच्या झगमगाटात विशाळगड परिसर प्रकाशमय झाला आहे. गडाच्या पायथ्यापासून दर्ग्यापर्यंत अनेक हॉटेल, विश्रामगृहे, श्रीफळ, शीतपेये, फुलांच्या चादरी, खेळण्याची दुकाने भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होती. भाविकांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून विश्राम ग्रहे, स्नानगृह जागोजागी रस्त्यालगत दिसून येत होती.

​ न्यायालयीन दिलासा आणि जनसागर

यंदा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने कुर्बानी व धार्मिक विधींना परवानगी दिल्याने भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो श्रद्धाळूंनी गडावर हजेरी लावली असून, यामुळे स्थानिक व्यापारालाही नवी उभारी मिळाली आहे. ​गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाहूवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा हा त्रिवेणी संगम विशाळगडावर पहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news