

विशाळगड : शिवकालीन किल्ले विशाळगडावर पर्यटकांविना सर्व व्यवहार ठप्प आहेत. गडावर स्थानिकांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश नाही. तब्बल सहा महिन्यानंतर विशाळगड आता पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. प्रशासनाने यास तात्पुरती परवानगी दिली असली तरी पर्यटकांना नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत. पर्यटकांनी नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी केले आहे. प्रशासनाने परवानगी दिल्याने गडवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र पर्यटकांना ३१ जानेवारीपर्यंतच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे.
विशाळगड अतिक्रमण मुक्त करून त्याचे ऐतिहासिक सौंदर्य व महत्त्व अबाधित राहावे आणि त्याचे जतन-संवर्धन-संरक्षण राष्ट्रीय संपत्ती म्हणून व्हावी, या उद्देशाने विशाळगड मुक्ती आंदोलन छत्रपती संभाजीराजे तसेच विविध संघटनेच्या वतीने रविवार (दि १४ जुलै २०२४) रोजी पुकारले होते. विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनास हिंसक वळण लागून गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तसेच विशाळगड अतिक्रमणाचा काहीही संबंध नाही, अशा गजापुरातील मुसलमान वाडीतील घरांची, वाहनांची, दुकानांची, प्रापंचिक साहित्यांची तोडफोड आंदोलनकर्त्यांनी केली. परिणामी परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. विशाळगड अतिक्रमण हटविण्याबाबत सहा महिन्यांपूर्वी घडलेली घटना संपूर्ण राज्य, देश नव्हे तर जगाचं लक्ष वेधून घेणारी ठरली. ती आजही कायम आहे.
गेली सहा महिने गड पर्यटकांविना सुना आहे. पर्यटन हे येथील लोकांचे जीवन जगण्याचे मुख्य स्रोत असल्याने उपासमारीमुळें गडवासीयांना गड सोडला आहे. तर काही आज ना उद्या गड पुन्हा सुरू होईल, या आशेवर आहेत. प्रशासनाने काही नियमांच्या अटीवर पर्यटकांना गडावर जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र गड सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतच पाहता येणार आहे.
येथील दर्गा व इतर देवदेवतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. गडावर जाणाऱ्या पर्यटक व भाविकांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. सायंकाळी पाचनंतर पर्यटक, भाविकांना गडावर जाता येणार नाही व मुक्कामही करता येणार नाही. कोणत्याही प्रकारची संघटना अथवा जमाव यांना धार्मिक व इतर कार्यक्रमासाठी शाहूवाडी पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घ्यावी लागेल. अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी याबाबत मनाई आदेश लागू केला असून या आदेशाची अंमलबजावणी करणे सर्वांना बंधनकारक आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे विशाळगड किल्ला परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे मासांहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत तसेच शिजवून तयार करून खाता येणार नाहीत.पर्यटकांची तपासणी करूनच पर्यटकांना विशाळगडावर सोडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.