

कोल्हापूर : महाराष्ट्र लुटून गुजरातच्या उद्योगपतींची पोळी भाजणारा शक्तिपीठ महामार्ग पंचगंगेत बुडवा आणि तो रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवा, असे थेट आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार विनायक राऊत यांनी रविवारी येथे केले. त्याचवेळी, कोल्हापुरातील रस्त्यांसाठी मंजूर शंभर कोटी रुपये सत्ताधार्यांनी गिळंकृत केले, असा गंभीर आरोप आमदार सुनील प्रभू यांनी केला. या लबाड लोकप्रतिनिधींना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असा घणाघातही त्यांनी केला.
दत्त मंगल कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आगामी कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला. खा. राऊत यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महापालिकेत एका नगरसेवकावरून आता पन्नासहून अधिक नगरसेवक निवडून आणा. शक्तिपीठ महामार्गासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या निधीत सोन्याचे रस्ते झाले असते; पण हा केवळ महाराष्ट्र लुटून गुजरातच्या उद्योगपतींना फायदा पोहोचवण्याचा डाव आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा प्रकल्प पंचगंगेत बुडवावा.
सरकार शेतकरी, महिला, कामगार अशा सर्वच घटकांची फसवणूक करत आहे. कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी आल्याचे सांगितले गेले; पण ते पैसे यांनी घशात घातले. शिवसैनिकांनी जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन उभारून या सरकारला सळो की पळो करून सोडावे. शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी झटावे, असे आवाहन आ. प्रभू यांनी केले.
शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठीच शिवसेनेला संपवण्याचा कट रचला जात आहे; पण शिवसेना संपत नाही, संपवते.
यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी स्वागतपर भाषणात कोल्हापुरात शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कुठलीही गटबाजी न करता आपण सर्वजण एकदिलाने शिवसेनेसाठी काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपनेते संजय पवार यांच्या मेळाव्यातील अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले होते. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी खुलासा केला. ते म्हणाले, संजय पवार सकाळी आम्हाला भेटून गेले आहेत. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते रक्षाविसर्जनासाठी गेले आहेत. ते सच्चे शिवसैनिक असून, कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहेत.