Vinayak Raut | राष्‍ट्रवादीकडून पदवीधरांची फसवणूक, जाहीर माफी मागा

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खा. विनायक राऊत यांचा घणाघात; पुणे पदवीधरमध्‍ये उद्धव ठाकरेंचा फोटो वापरून मते मागू नका
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाच्‍या पदवीधर मेळाव्‍यात बोलताना माजी खा. विनायक राऊत. शेजारी आ. सुनील प्रभु, नितीन बानुगडे-पाटील, अरुण दुधवडकर, सत्‍यजित पाटील-सरुडकर, सुनील मोदी, संजय पवार, विजय देवणे व इतर.
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाच्‍या पदवीधर मेळाव्‍यात बोलताना माजी खा. विनायक राऊत. शेजारी आ. सुनील प्रभु, नितीन बानुगडे-पाटील, अरुण दुधवडकर, सत्‍यजित पाटील-सरुडकर, सुनील मोदी, संजय पवार, विजय देवणे व इतर. (छाया : पप्‍पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघात राष्‍ट्रवादी शरद पवार गटाच्‍या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्‍या प्रचार पत्रकावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो वापरून मते मागितली जात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असतानाही अशा पद्धतीने मते मागणे म्‍हणजे मतदारांची साफ फसवणूक आहे. त्‍यांनी पत्रकावर ठाकरे यांचा फोटाे वापरू नये. तसेच मतदारांची जाहीर माफी मागावी, असा घणाघात शिवसेनेचे माजी खा. विनायक राऊत यांनी केला. फोटो न हटविल्‍यास उमेदवाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्‍याचा इशाराही राऊत यांनी दिला.

शिवसेना ठाकरे गटाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुनील मोदी यांच्‍या प्रचारार्थ कोल्‍हापुरात शिवसैनिकांचा मेळावा झाला. याप्रसंगी राऊत बोलत होते. यावेळी आ. सुनील प्रभु, नितीन बानुगडे-पाटील, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर प्रमुख उपस्‍थित होते. माजी खा. राऊत यांनी, राष्‍ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार हे मोठे नेते आहेत. आ. जयंत पाटील ज्‍येष्‍ठ नेते आहेत. राज्‍यपातळीवर मोठा पक्ष असूनही राष्‍ट्रवादीच्‍या पुणे पदवीधर मतदारसंघाच्‍या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्‍या प्रचार पत्रकावर उद्धव ठाकरे यांचा फोटो वापरला आहे. याच मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक रिंगणात असताना ठाकरे यांचा फोटो वापरून मते मागणे म्‍हणजे मतचोरी असून मतदारांची घोर फसवणूक आहे. राष्‍ट्रवादीने हा प्रकार तत्‍काळ थांबवावा आणि पत्रकामध्‍ये ठाकरे यांचा फोटो न वापरता प्रचार करावा, असे आवाहन केले.

नितीन बानुगडे-पाटील यांनी, पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरले होते. त्‍यानुसार अमरावती आणि छ. संभाजीनगरची जागा शिवसेनेला मिळाली होती. तरीही अमरावतीमध्‍ये काँग्रेसने आणि छ. संभाजीनगरमध्‍ये राष्‍ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार दिला. मग आघाडीचा धर्म केवळ शिवसेनेनेच पाळायचा का, असा प्रश्‍न केला. तसेच शिवसेनेने दगा केला नसून तुम्‍ही अमरावती, छ. संभाजीनगरमध्‍ये शिवसेनेला दगा दिल्‍याने पुणे पदवीधरमधून शिवसेनेने उमेदवार दिला असल्‍याचे बानुगडे-पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. मेळाव्‍याला उपनेते संजय पवार, माजी आ. सत्‍यजित पाटील-सरुडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्‍हा प्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख मंजीत माने, विशाल देवकुळे व शिवसैनिक उपस्‍थित होते.

शिवसेना तुमच्‍या आघाडीत नाही म्‍हणून सांगा

उमेदवार सुनील मोदी यांनी राष्‍ट्रवादीच्‍या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्‍या प्रचारासाठी आता काँग्रेस, राष्‍ट्रवादी शरद पवार गटाचे लोक तुम्‍हाला भेटायला येतील. महाविकास आघाडीच्‍या नावाखाली तुमच्‍याकडे मते मागतील; पण त्‍यांना शिवसेना तुमच्‍या आघाडीत नाही असे स्‍पष्‍टपणे सांगा, असे आवाहन मोदी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news