MLA Vinay Kore | विरोधकांचा श्रेयवादी अहंकार सभासदच मोडीत काढतील

आमदार विनय कोरे यांचा घणाघात; दसऱ्याला विजयाचे तोरण उभारूया
कोतोली : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना अरुण नरके, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डाॅ. विनय कोरे व उपस्थित ठरावधारक.
कोतोली : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना अरुण नरके, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डाॅ. विनय कोरे व उपस्थित ठरावधारक.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : इतरांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची विरोधकांची प्रवृत्ती आहे. त्यांचा हा अहंकार यावेळी सभासद मोडीत काढतील. सहकारामध्ये अहंकारापेक्षा विनय महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत विरोधकांना याचा धडा मिळेल, असा जोरदार घणाघात आमदार विनय कोरे यांनी केला. शाहूवाडी आणि पन्हाळ्याचा गड अभेद्य असून येत्या दसऱ्याला विजयाचे तोरण उभारूया, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी तालुक्यांतील ठरावधारकांचा मेळावा कोतोली फाटा येथील लक्ष्मी पॅलेस हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ नेते अरुण नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, माझ्या मतदारसंघातील सर्व ठरावधारक एकजुटीने छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये पोटशूळ उठला असून बेताल वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ आश्वासने देऊन निवडणूक जिंकता येत नाही, त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विरोधक केवळ ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा विजय निश्चित आहे. ज्येष्ठ नेते अरुण नरके म्हणाले, गोकुळ दूध संघ ही सर्वसामान्य दूध उत्पादकांची संस्था आहे. ही संस्था राजकारणाचा अड्डा बनवण्याचे पाप विरोधक करत आहेत. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी गोकुळचा वापर करू नका.

या मेळाव्याला माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, राजेश पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांच्यासह छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार व ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेक नॅरेटिव्हचा बादशाह....!

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ज्यांनी स्वतःच्या साखर कारखान्यातील हजारो सभासद रातोरात कमी करून कारखाना खासगी करण्याचा डाव आखला आहे, त्यांनाच आता गोकुळच्या सभासदांचा पुळका आला आहे, पण त्यांचे हे पुतना-मावशीचे प्रेम सभासद पुरते ओळखून आहेत. म्हणूनच या निवडणुकीत २५-० ने छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा विजय निश्चित आहे. प्रत्येक निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणाऱ्या विरोधकांना आता ठरावधारकच त्यांची जागा दाखवतील. या मेळाव्याला ठरावधारकांनी लावलेली उपस्थिती विजयाची ग्वाही देणारी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news