

कोल्हापूर : शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील १२३ शिक्षकांना वर्ष २०२५-२६ चा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला. यात प्राथमिक गटात मुख्याध्यापक विलास पिंगळे, माध्यमिकच्या वर्षा मस्के तर विशेष क्रीडा शिक्षक म्हणून प्रदीप साळोखे या कोल्हापुरातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कारार्थीमधील विलास पिंगळे महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. २८ वर्षे त्यांनी सेवा बजावली असून यातील १९ वर्षे ते मुख्याध्यापक आहेत. यापूर्वी महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत त्यांचे शेकडो विद्यार्थी चमकले आहेत. पुरस्कार मिळाल्याने आजवर केलेल्या प्रामाणिक सेवेचे सार्थक झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वर्षा मस्के उषाराजे हायस्कूलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या गेल्या २२ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात आहेत. एनसीसी सहयोगी अधिकारी असून त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. नवोपक्रम स्पर्धेत त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्य सरकारच्या आयडॉल शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. विद्यार्थिनींसाठी केलेले कार्य, परिश्रमाचे यश आहे, असे त्या म्हणाल्या.
विशेष क्रीडा शिक्षक म्हणून महाराष्ट्र हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे सहायक शिक्षक प्रदीप साळोखे यांची निवड झाली आहे. गेली तीन दशके फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील खेळाडू त्यांनी घडविले आहेत. केवळ खेळ शिकविण्याच्या पलीकडे त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम केले आहे. शासनाच्या पुरस्काराने क्रीडा क्षेत्राचा गौरव झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पुरस्कार वितरण सोहळा ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबई येथे होणार आहे.