

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील 28 केंद्रांवर रविवार, दि. 10 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता पारदर्शकपणे परीक्षा पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. संपूर्ण परीक्षा कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेपेक्षा दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
टीईटी परीक्षेंतर्गत पेपर क्र. 1 सकाळी 10 ते 1 तर पेपर क्र. 2 ते 5 यावेळेत होणार आहे. परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड माध्यमातून होणार आहे. पेपर क्र. 1 ला 6 हजार 103 तर पेपर क्र. 2 साठी 9 हजार 677 उमेदवार बसणार आहेत. चार परीक्षा केंद्रांसाठी एक झोनल अधिकार्याची नियुक्ती केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी एक सहायक परिरक्षकाची नियुक्ती केली आहे. 500 पेक्षा जास्त परीक्षार्थी असलेल्या केंद्रावर उपकेंद्र संचालक असणार आहे. जिल्हा परिषदेत परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. परीक्षेसाठी भरारी पथक नेमण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षा केंद्रास भेटी देऊन पाहणी करणार आहेत, असे शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी सांगितले.
टीईटी परीक्षार्थींना पेपर सुरू होण्यापूर्वी फेसरीडिंग, बायोमेट्रिक हजेरी, स्कॅनिंग, आधार व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षार्थीने येताना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले मूळ प्रवेशपत्र घेऊन यावे. पहिल्या पेपरसाठी सकाळी 9 वाजता तर दुसर्या पेपरला 1 वाजता परीक्षार्थींनी उपस्थित राहावे. परीक्षार्थींची उपस्थिती बायोमेट्रिकद्वारे घेतली जाणार असल्याने पहिला पेपर संपल्यानंतर दुसर्या पेपरला बसणार्या परीक्षार्थीने पुनश्च प्रवेशद्वाराबाहेर जाऊन बायोमेट्रिक उपस्थिती देणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर यांनी दिली.