कोल्हापूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात चॅट-जीपीटी कालबाह्य झाले असून त्याच्यापुढील नवीन ‘एआय’ आले आहे. यातून अनोख्या गोष्टी शिकायला मिळत आहेत, ही नव्या युगाची नांदी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सर्व काही नसून पारंपरिक बीए, बीकॉम अभ्यासक्रमाबरोबरच इंजिनिअरिंग, मेडिकल यांसारख्या विद्या शाखा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्याला ‘एआय’ची जोड दिल्यास यशस्वी करिअर शक्य आहे, असा मौलिक सल्ला शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दै.‘पुढारी’ आयोजित ‘एज्यु-दिशा 2026’ शैक्षणिक प्रदर्शनाचे शनिवारी राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात थाटात उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. शैक्षणिक प्रदर्शनाचे संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक आहेत. पावर्ड बाय प्रायोजक म्हणून ‘विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे आहेत. सहयोगी प्रायोजक म्हणून एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी तर एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप हे सहप्रायोजक आहेत.
कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मतानुसार एकाच पद्धतीने विचार करणे आता कालबाह्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या युगातील पिढी मल्टीटास्किंग करणारी आहे. परंतु यात काही फायदे व तोटे आहेत. शाळा, कॉलेजवर जास्त अवलंबून न राहता उपलब्ध मोफत साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण विचार करायला शिकले पाहिजे. सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा याला मर्यादा असायला हव्यात. हे नवे माध्यम तुमचा वापर करून घेत आहे, यातून आनंद मिळाल्याने अॅडिक्ट होत आहोत. आजच्या पिढीचा रिटेंन्शन व अटेंशन स्पॅन खूप कमी झाला आहे. अटेंशन स्पॅन वाढविण्यासाठी अभ्यासाबरोबर सामान्य ज्ञान मिळवणे, वर्तमानपत्र वाचन महत्त्वाचे आहे. जग व भोवतालचा परिसर सुंदर आहे. परंतु ध्येयाकडे वाटचाल करताना स्वत:मध्ये रोज थोडा थोडा बदल करीत जाणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
दै.‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी ‘एज्यु-दिशा’ शैक्षणिक प्रदर्शन आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, ‘एज्यु-दिशा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून शिक्षणाचा महाकुंभ भरला आहे. सध्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील गोंधळाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी, पालकांच्या मनात भविष्याबद्दल साशंकता आहे. त्यामुळेच अशा शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबिरांची गरज आहे. यात ‘पुढारी’ने खारीचा वाटा उचलला आहे. आजचे विद्यार्थी नव्या पिढीचे नायक आहेत. त्यांना बोट धरून दिशा दाखविण्याचे काम ‘एज्यु-दिशा’च्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दै.‘पुढारी’चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार यांनी आभार मानले. यावेळी विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणेच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे प्रा. राहुल माटे, भारती विद्यापीठ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. राजेश कंठे, एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी सोलापूरचे अॅडमिशन अँड आऊटरीच प्रमुख अनुपसिंग, चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. भारत खराटे (कोल्हापूर विभाग), एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणेचे डॉ. उल्हास माळवदे, भारती विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटी पुणेच्या प्रा. डॉ. मंजुश्री कदम, दै. ‘पुढारी’चे सहायक समूह सरव्यवस्थापक अमित डिक्कर, दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर आदी उपस्थित होते.
प्रेशरला पॅशनमध्ये बदला : भोसले
संजय घोडावत विद्यापीठाचे व्यवस्थापकीय संचालक विनायक भोसले म्हणाले, प्रत्येकाला दृष्टी आहे, परंतु दृरदृष्टी नसते. दृरदृष्टी नसेल तर व्यक्ती दिशाहीन होते. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून करिअर निवडावे. ध्येय निश्चित झाल्यावर त्यादृष्टीने वाटचाल विद्यार्थ्यांनी करावी. जीवनात धोका पत्करल्याशिवाय यशस्वी करिअर होऊ शकत नाही. किती मोठे झाले तरी आई-वडिलांना विसरू नका. आयुष्याचे व्हिजन खूप मोठे ठेवा. पाय जमिनीवर ठेवून काम करा. प्रेशरला पॅशनमध्ये बदलून यशस्वी होण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. करिअर निवडताना पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी. जे करायचे ते मजेत आनंदी राहिल्यास यशस्वी होता येईल. मला सर्व काही येते असे न समजता आयुष्यभर विद्यार्थ्यांनी शिकत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
इतिहासाच्या पानात दै.‘पुढारी’चे योगदान कायम
15 वर्षांत विद्यार्थ्यांना दिशा दाखविण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे. ‘पुढारी’ वर्तमानपत्र नसून लोकचळवळ आहे. याच्या व्यासपीठावरून अनेकांनी आपले करिअर घडविले आहे. कोल्हापूरच्या सर्वच लढ्यांत ‘पुढारी’ अग्रणी राहिला आहे. इतिहासाची पाने लिहिताना ‘पुढारी’चे योगदान कायम लक्षात राहील, असेही कुलगुरू डॉ. कामत म्हणाले.
‘एज्यु-दिशा’ शैक्षणिक प्रदर्शनात आज तीन ज्ञानसत्र
‘एज्यु-दिशा’ शैक्षणिक प्रदर्शनातील रविवारी संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वप्नील हिरीकुडे यांचे सकाळी 11 वाजता ’बारावीनंतर उच्च व तंत्र शिक्षणातील संधी : महत्त्व व आव्हान’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विद्यावाचस्पती विद्यानंद ऊर्फ प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी ’दहावी, बारावीनंतरचे करिअरचे पर्याय आणि संधी’ याविषयावर मार्गदर्शन करतील. सायं. 5 वाजता स्कूल ऑफ बिझनेस एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे सहायक प्रा. डॉ. सागर पाटील हे ’कॉलेजपासून कार्पोरेटपर्यंत नव्यायुगातील बीबीए मॉडेल’ या विषयावर व्याख्यान होईल.
जनरेशन ‘एक्स ते अल्फा’ हा प्रवास जलद गतीने
सध्या ‘एआय’चा जमाना आहे. जागतिक महायुद्धाच्या काळात असणारी पिढी जनरेशन ‘एक्स’ होती. 1960 पर्यंत जनरेशन ‘वाय’, त्यानंतर बेबी बुमर्स, मिलेनियर्स व त्याच्यापुढे जेन झी आले. नुकतीच जन्माला आलेली मुले ‘अल्फा’ जनरेशन आहेत. या सर्वांमध्ये विचार करण्याची तफावत आहे. जनरेशन ‘एक्स ते अल्फा’ हा प्रवास जलद गतीने झाल्याचे कुलगुरू डॉ. कामत म्हणाले.