कोल्हापूर : सजावट, सुशोभीकरण यांचा अतिरेक न करता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्या अंतरंगात प्रेक्षक, कलाकार यांच्यासाठी सुविधांचा पडदा उघडू द्या. विंगेपासून आसनगृहातील शेवटच्या खुर्चीपर्यंत एकही त्रुटी राहणार नाही यावर पुनर्उभारणीच्या कामात भर द्या असा सूचनावजा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक, नाट्यकर्मी डॉ. जब्बार पटेल यांनी दिला. शुक्रवारी सकाळी डॉ. पटेल यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या नाट्यगृहाच्या पुनर्उभारणी कामाची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी डॉ. पटेल म्हणाले, केशवराव नाट्यगृहाचा गाभा हा त्याचा रंगमंच आहे. रंगमंचाची उंची वाढवली आहे का, या पहिल्या प्रश्नानेच त्यांनी चर्चेला सुरुवात केली; मात्र विशिष्ट बांधणीला धक्का न लावता रंगमंचाच्या उंचीत काहीही बदल न केल्याचे कारागीरांनी सांगितले. डॉ. पटेल यांनी विंगेचा आवार, आसनगृह, रंगभूषा दालन, स्वच्छतागृह, खासबाग मैदानासह रंगमंच या जागा पाहिल्या.
सुविधांना प्राधान्य द्यावे. रंगमंचाच्या विंगेत भरपूर जागा ठेवावी. ध्वनी यंत्रणा सक्षम करावी. कायमस्वरूपी ध्वनी यंत्रणा तंत्रज्ञ नेमण्याविषयीही सांगितले. ग्रीनरुम, स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत. रंगकर्मींनी पुनर्उभारणीच्या कामावर लक्ष ठेवावे, अशीही सूचना डॉ. पटेल यांनी केली. यावेळी ‘अशी पाखरे येती’ या नाट्यप्रयोगाच्या काही आठवणींना डॉ. पटेल यांनी उजाळा दिला. याप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, नाट्यवितरक आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, अभिनेते आनंद काळे, प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, किरण चव्हाण, उदय कुलकर्णी, डॉ. शशिकांत चौधरी यांच्यासह अनेक रंगकर्मी उपस्थित होते.