कोल्हापूर : केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळावर 3-2 अशा गोलफरकाने मात केली. तत्पूर्वीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघाचा 7 विरुद्ध 1 असा धुव्वा उडवत आगेकूच केली. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
वेताळमाळ तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळाचा 3 -2 असा विजय मिळवला. वेताळमाळच्या आकाश माळीने 15 व्या मिनिटाला गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली. दिलबहारकडून 35 व्या मिनिटाला स्वयंम साळोखेच्या पासवर फेबीन याने गोलची परतफेड केली. वेताळमाळच्या मिथाईने संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. जादा वेळेत (80+2) सर्वेश वाडकरने गोल नोंदवत आघाडी 3-1 अशी भक्कम केली. दिलबहारकडून शेवटच्या क्षणी प्रीतम भोसले याने गोल नोंदवत सामना 3-2 असा केला. मात्र उर्वरित गोलची परतफेड करता आली नाही.
अन्य सामन्यात प्रॅक्टिस क्लबने पाटाकडील ‘ब’ चा 7-1 असा एकतर्फी पराभव केला. प्रॅक्टिसच्या आकाश बावकरने 13, 15, 57 व 64 व्या मिनिटाला चार गोल केले. केवल कांबळेने 18 व्या तर साहिल डाकवेने 20 व 26 व्या मिनिटाला दोन गोल केले. पाटाकडीलतर्फे महंमद सैफने एकमेव गोल केला.
मर्दानी खेळाचा आखाडा, पोलिस संघांचे विजय
दरम्यान, सकाळच्या सत्रात केएसए ‘ब’ गट फुटबॉल साखळी सामन्यांना प्रारंभ झाला. मर्दानी खेळाचा आखाडा व कोल्हापूर पोलिस संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. मर्दानी खेळाचा आखाडा संघाने बीजीएम स्पोर्टस्चा 1-0 असा पराभव केला. विजयी गोल अक्षय सरनाईकने केला. दुसर्या सामन्यात पोलिस संघाने प्रॅट्रीएट स्पोर्टस्वर 4-0 असा एकतर्फी विजय मिळवला. ओंकार पाटील, अभिषेक भोपळे, संकेत वेसणेकर, देवराज जाधव यांनी गोल केले.