

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींसाठी महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षात बाजी कोण मारणार, सत्ताधारी कोण ठरणार, याचा फैसला रविवारी (दि. 21) दुपारी 12 पर्यंत होणार आहे.
जिल्ह्यातील नेत्यांनी स्थानिक पातळीवर आघाड्या करत राज्यातील आपल्याच सहकार्यांना अनेक ठिकाणी आव्हान देत एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता, यामुळे नगर परिषद व नगर पंचायतीवर कोणत्या स्थानिक आघाडीचा झेंडा फडकणार, त्यातूनच जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, कागल, गडहिंग्लज, मुरगुड, वडगाव, पन्हाळा आणि मलकापूर या दहा नगर परिषदा आणि हातकणंगले, आजरा व चंदगड या तीन नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान झाले होते. या निवडणुकीत चुरस आणि ईर्ष्या टोकाला गेली होती, त्यातून सरासरी 78.67 टक्के इतके मतदान झाले होते. रविवारी याची मतमोजणी होत आहे. सकाळी दहा वाजता मत मोजणीला प्रारंभ होईल. तासाभरातच बहुतांशी सर्व निकाल स्पष्ट होतील. दुपारी 12 पर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, अशी शक्यता आहे. या मत मोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी एकूण 790 अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती केली असून त्यांचे मत मोजणीचे प्रशिक्षण झाले आहे.
जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि तीन नगर पंचायतीसाठी महायुती, महाविकास आघाडीत बिघाडीच झाली. राज्यात एकत्र असलेल्या महायुती आणि महाविकास आघाड्या या निवडणुकीत मात्र एकत्र आल्या नाहीत. सर्वच ठिकाणी स्थानिक आघाड्या तयार करताना नेत्यांनी राजकीय सोय साधली, त्यांच्या या प्रयत्नाला मतदारांनी किती साथ दिली, हे रविवारी समजणार आहे. मुरगूड, मलकापूर, पन्हाळा, आजरा आणि चंदगडमध्ये प्रत्येकी दोनच फेर्या होणार आहेत. यामुळे या ठिकाणची मतमोजणी अवघ्या अर्धा तासांतच पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. कागल, हुपरी, जयसिंगपूर, हातकणंगले, गडहिंग्लज, शिरोळ, वडगाव आणि कुरूंदवाडची मतमोजणी तास - दीड तासात पूर्ण होणार आहेत.
गडहिंग्लजच्या एका प्रभागात 75.2 टक्के मतदान
गडहिंग्लज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ‘3 अ’ साठी शनिवारी (दि. 20) मतदान झाले. या प्रभागात 75.2 टक्के मतदान झाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत तीन मतदान केंद्रांवर 2479 मतदारांपैकी 1853 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मिरवणुकांवर बंदी!
निकालानंतर विजयी उमेदवार, त्यांचे समर्थक आदींना सार्वजनिक ठिकाणी विजयी मिरवणुका तसेच गुलालाची उधळण करता येणार नाही. असे कृत्य आढळून आले तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
मतमोजणी परिसरात निर्बंध लागू
मतमोजणीच्या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. मतमोजणी केंद्रांपासून 200 मीटर परिसरात या निर्बंधांची अंमलबजावणी करावी लागेल. परवानगी असलेल्या तसेच निवडणूक निर्णय अधिकार्यांनी ओळखपत्र दिलेल्यांनाच मतमोजणी केंद्रांवर प्रवेश दिला जाणार आहे.