

डॅनिलय काळे
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या महासंकटात रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी शासनाने आपत्कालीन परिस्थितीत दिलेले व्हेंटिलेटरच ‘कोमात’ गेले आहेत. अवघ्या काही वर्षांतच जिल्ह्यातील तब्बल 76 व्हेंटिलेटर नादुरुस्त होऊन धूळ खात पडले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेकडील 64 आणि महापालिकेच्या ताब्यातील 12 व्हेंटिलेटरचा समावेश आहे. परिणामी, शासकीय रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात (आयसीयू) गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी व्हेंटिलेटरच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोना काळात राज्यभरात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत होता. ही गरज ओळखून शासनाने तातडीने कोट्यवधी रुपये खर्च करून व्हेंटिलेटर खरेदी केले आणि जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले. मात्र, ही जीवनदायी उपकरणे सांभाळण्यात आणि त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) आयसीयूमध्ये रुग्णांची गर्दी वाढताच व्हेंटिलेटरची कमतरता जाणवते, तर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात केवळ दोन व्हेंटिलेटर सुरू आहेत. हीच परिस्थिती उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्येही आहे. विशेष म्हणजे, ही समस्या केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित नसून, राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्येही अशीच स्थिती असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीचा फायदा घेत काहीजणांनी घाईगडबडीत निकृष्ट दर्जाच्या उपकरणांचा पुरवठा करून रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचा संशय व्यक्त होत आहे. कारण, इतक्या कमी कालावधीत ही उपकरणे बंद पडणे हे गंभीर आहे. उपकरणे मिळाल्यानंतर त्यांची वॉरंटी, देखभाल आणि दुरुस्तीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष याला जबाबदार आहे. या अनास्थेमुळे भविष्यात आरोग्य संकट उभे राहिल्यास रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जबाबदारी निश्चित करून ही उपकरणे कार्यान्वित करण्याची गरज आहे.
जेव्हा रुग्ण नैसर्गिकरीत्या श्वास घेऊ शकत नाही, तेव्हा कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटरचा वापर केला जातो.
कोरोना, न्यूमोनिया, फुफ्फुस निकामी होणे
मेंदूला झालेली गंभीर इजा किंवा कोमा
गंभीर अपघातांमध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी
अनेकदा वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने रुग्ण दगावल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.