kolhapur | व्हेंटिलेटरअभावी कोंडला श्वास, सीपीआरमध्ये रुग्णांना जीवघेणा त्रास

निम्मे व्हेंटिलेटर बंद, रुग्ण ‘वेटिंग’वर; पीएम केअरमधील 50 व्हेंटिलेटर धूळ खात
ventilator-shortage-causes-severe-distress-to-patients-in-cpr-hospital
kolhapur | व्हेंटिलेटरअभावी कोंडला श्वास, सीपीआरमध्ये रुग्णांना जीवघेणा त्रासPudhari File Photo
Published on
Updated on

एकनाथ नाईक

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचारासाठी येणार्‍या अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी दररोज ‘वेटिंग’वर थांबावे लागत आहे. रुग्णालयातील 140 पैकी तब्बल 68 व्हेंटिलेटर बंद असून, त्यातील 50 व्हेंटिलेटर तर ‘पीएम केअर’ निधीतून मिळालेली आहेत. यामुळे गंभीर रुग्णांना जीव वाचवण्यासाठी खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत असून, प्रशासन काय करत होते, असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.

कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून सीपीआरला सुमारे 70 कोटी रुपयांची उपचारपूरक साधने मिळाली. यात मोठ्या संख्येने व्हेंटिलेटरचा समावेश होता. मात्र, आज रुग्णालयातील एकूण 140 व्हेंटिलेटरपैकी केवळ 72 व्हेंटिलेटर चालू असून, तब्बल 68 व्हेंटिलेटर बंद अवस्थेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील 18 व्हेंटिलेटर तर दुरुस्तच होऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे मेडिकल आयसीयू, ट्रॉमा केअर, नवजात शिशू अतिदक्षता विभाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी व्हेंटिलेटरची तीव्र गरज असतानाही, दररोज 4 ते 5 रुग्णांना जीव मुठीत धरून ताटकळत राहावे लागत आहे.

एका नामांकित कंपनीकडून ही व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आली असतानाही त्यांची दुरुस्ती का होत नाही, हा चर्चेचा विषय बनला आहे. नवीन उपकरणांच्या खरेदीची प्रक्रिया असेल, तर प्रशासन गतीने कामाला लागते. मग बंद पडलेली जीवनदायी व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला ‘इंटरेस्ट’ का नाही? याची चर्चा सीपीआरच्या वर्तुळात सुरू आहे. ही उपकरणे वेळेत दुरुस्त झाली, तर अनेक गंभीर रुग्णांना जीवदान मिळू शकते.

तज्ज्ञ डॉक्टर आहेत, पण उपकरणे निकामी

एकीकडे सीपीआरमध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांमुळे रुग्णालयाच्या लौकिकात भर पडत आहे. साधा खोकला, सर्दी झाली तरी रुग्ण विश्वासाने येथे उपचारासाठी येतात. मात्र, दुसरीकडे डॉक्टरांच्या हाताला आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणेच निकामी ठरत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांना दर्जेदार उपकरणे उपलब्ध करून दिली, तरच सीपीआरचा हा लौकिक भविष्यात कायम राहील, अन्यथा रुग्णांचा विश्वास डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news