

कोल्हापूर : शहरातील नागाळा पार्क परिसरात एका माथेफिरूने वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये सहा ते सात चारचाकींचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार नगरसेवक अर्जुन माने यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली आहे. दगडफेक करणार्या माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, तो मनोरुग्ण असल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
नागाळा पार्क येथे मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मेरी वेदर मैदान परिसरातील रिक्षासह अन्य एका चारचाकीची तोडफोड केली. यावेळी येथील तरुणांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारला, पण तो मनोरुग्ण असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांनी त्याला सोडून दिले. यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास संबंधित माथेफिरूने येथील अन्य चार ते पाच वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये चारचाकींच्या काचा फुटून नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले. पण, तो मनोरुग्ण असल्याने पोलिसांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले.