

मुदाळतिट्टा: वेदगंगा नदीला महापूर आला आहे. वेदगंगा नदीतील पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे राधानगरी-मुदाळतिट्टा-निपाणी या महत्वाच्या राज्य मार्गावर निढोरी यमगे दरम्यान रस्त्यावर पाणी आले आहे. मुरगुड येथील स्मशान शेड जवळ चार फुटापेक्षा जास्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे येथून होणारी वाहतूक दुसऱ्या दिवशी बंद झाली आहे. निढोरी ते यमगे दरम्यान असणारा तीन किलोमीटरचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. सध्या निढोरी भडगावपाटी कागल अशी वाहतूक सुरू आहे.
कोल्हापूर -मुदाळतिट्टा-गारगोटी या राज्य मार्गावर कुर मडिलगे दरम्यान रस्त्यावर वेदगंगा नदीचे महापुराचे पाणी आले आहे. यामुळे येथून होणारी वाहतुक बंद झाली आहे. आता गारगोटी, महालवाडी, म्हसवे, कुर मुदाळतिट्टा कोल्हापूर अशी वाहतूक सुरू आहे. कुर-मडीलगे व निढोरी येथे सुरक्षेचा उपाय म्हणून बॅरिकेट्स ट्रॅक्टर रस्त्याच्या आडवे लावले आहेत. पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.
मुरगुड (ता. कागल) येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे मुरगूड-कापसी मार्गावर होणारी वाहतूक बंद झाली आहे. मुरगूड शहराला तीन बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे. मुरगूड चिमगाव गंगापूर व बोळावी ,हसूर ,कापसी, पांगिरे गडहिंग्लज मार्गे अशी तुरक वाहतूक सुरू आहे.