

नृसिंहवाडी : पुढारी वृत्तसेवा
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दोन ते आठ एप्रिल हे सात दिवस श्रींच्या मुख्य चरण कमलावर संततधार अनुष्ठान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे दत्त मंदिर सात दिवस अहोरात्र खुले राहणार आहे.
सर्वारिष्ट शांती करता दत्त देवस्थान समितीने हा सोहळा आयोजित केला असून, या निमित्त सात दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रोज सायंकाळी साडेसहा वाजता भाविक तसेच नागरिकांना शंख तीर्थ व प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रोज दुपारी होणारी महापूजा रात्री सात वाजता होणार आहे.
सात दिवस संततधार सोहळ्यात मुख्य चरणावर कृष्णा नदीच्या जलधारांचा अभिषेक होणार आहे. सकाळी रुद्र व रात्री पवमान सुक्तांचे ब्रह्म वृद्धांकडून पठण होईल. श्रींच्या उत्सव मूर्ती समवेत हा सोहळा होत आहे. भाविकांनी बदललेल्या कार्यक्रमाची नोंद घ्यावी असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळु सेक्रेटरी, गजानन पुजारी यांनी केले आहे. सध्या या संततधार सोहळ्याची तयारी येथे जोरदार सुरू आहे.