

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखविताना देशात सर्वप्रथम राज्याच्या राजधानीपासून प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला बगल देत मध्य रेल्वेने दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापूरला मात्र पहिल्या यादीतून वगळले होते. आता उशिरा का होईना या चुकीचे परिमार्जन होते आहे. पुण्याहून कोल्हापूरसाठी आठवड्यातून तीन दिवस धावणार्या वंदे भारतपाठोपाठ राजधानी मुंबईतून कोल्हापूरला दुसर्या वंदे भारत रेल्वेचे नियोजन सुरू आहे. ही गाडी 26 जून रोजी राजर्षी शाहू जयंतीच्या मुहूर्तावर शाहू वंदन करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाली तर 100 वर्षांपूर्वी कोल्हापुरात मिरजहून स्वबळावर रेल्वे आणणार्या राजर्षींना ती एक अनोखी मानवंदना ठरू शकते.
कोल्हापूरहून मुंबईला जाणार्या व येणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. 1971 साली सुरू झालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी दररोज वाढते आहे. सरासरी 200 प्रवासी प्रतीक्षा यादीवर असतात. त्याला पर्यायी गाडीची आवश्यकता होती. दीर्घकाळ मागणीही सुरू होती. वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापुरात येण्याविषयी दैनिक ‘पुढारी’ने सर्वप्रथम आवाज उठविला होता. मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीने हा प्रश्न लावून धरला आणि कोल्हापूचे खासदार धनंजय महाडिक यांचा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत असलेला संपर्क फळाला आला. यामुळे कोल्हापूर-मुंबई वंदे भारत गाडीची तयारी सुरू झाली आहे. तिचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
रेल्वे सल्लागार समितीने या गाडीला इंटरसिटी एक्स्प्रेसचा दर्जा देऊन पहाटे ही गाडी मुंबईकडे रवाना करावी आणि दुपारी मुंबईहून कोल्हापूरकडे मार्गस्थ करावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. तथापि, रेल्वे विभागातील सूत्रांनुसार ही गाडी रात्री 10.30 नंतर सोडून पहाटे मुंबईत पोहोचवणे आणि दुसर्या दिवशी सकाळी निघून ती दुपारी कोल्हापुरात आणणे या पर्यायावरही विचार सुरू असल्याचे समजते. वंदे भारत या गाडीला स्लिपर कोच नाहीत. यामुळे रेल्वेच्या दुसर्या पर्यायाचा विचार केला, तर प्रवाशांना रात्री बसून प्रवास करावा लागेल आणि यामुळे सकाळी मुंबईत पोहोचताच कामांना सुरुवात करणे कठीण होणार आहे. तसेच, दोन तासांच्या फरकाने मुंबईला दोन गाड्या सोडण्याऐवजी पहाटे ही गाडी मुंबईला रवाना केली तर 11 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचता येऊ शकते आणि दुपारी तेथून गाडी सुटली तर रात्री मुक्कामाला परत कोल्हापूरला येता येऊ शकते.
कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस 21 डब्यांची गाडी आहे. या गाडीला 518 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी साडेदहा तासांचा कालावधी लागतो. या प्रवासात 15 थांबे आहेत. तर, वंदे भारत या 8 डब्यांच्या गाडीला थांब्यांची संख्या 5 आणि पुश-पुल प्रकारचे इंजिन असल्यामुळे खंडाळ्याच्या घाटामध्ये नवे इंजिन जोडण्याची गरज भासत नाही. साहजिकच, ही गाडी 8 तासांत अंतर कापेल असे नियोजन आहे. केटरिंग व्यवस्था असल्याने प्रवास आरामदायी होऊ शकतो.
मुंबईहून सध्या कोकण रेल्वेमार्गे गोव्याला जाणारी वंदे भारत ही गाडी 559 किलोमीटर इतके अंतर आहे. या गाडीला मुंबईहून मडगावला पोहोचण्यासाठी साडेसहा तास लागतात. ही गाडी मुंबईहून वैभववाडी रेल्वेस्थानकावर सव्वाचार तासांत पोहोचते. यामुळे जर कोल्हापूरहून वैभववाडीला कोकण रेल्वेला जोडणारा 114 किलोमीटर लांबीचा मार्ग तातडीने हाती घेतला, तर कोकण रेल्वेमार्गे वंदे भारत कोल्हापुरात 6 तासांत आणण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. अर्थात, त्यासाठीही जनरेटा आणि लोकप्रतिनिधींचा दबाव महत्त्वाचा आहे.