

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे अधिविभाग व संलग्न महाविद्यालयांतील विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी यंदा हजारो जागा रिक्त राहिल्या आहेत. पदव्युतर अभ्यासक्रम (पीजी सेंटर), स्वायत्त महाविद्यालयांमुळे अधिविभागातील प्रवेश संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. याला विद्यापीठ प्रशासन व अंतर्गत त्रुटी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठाचे कोल्हापूर, सांगली व सातारा हे कार्यक्षेत्र आहे. यात सुमारे २९५ हून अधिक महाविद्यालये व २ लाख ५० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील काही वर्षांत विद्यापीठाने महाविद्यालयांना पीजी सेंटर, पीएच.डी. सेंटर सुरू करण्यास मान्यता दिली. काही ठिकाणी विद्यार्थी संख्या कायम राहावी, यासाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. परिणामी, विद्यापीठ अधिविभाग व काही संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या रोडावली आहे. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत चालले आहे. विद्यार्थी संख्येबाबत नेमलेल्या समितीच्या शिफारसीकडे विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
बॅचलर, मास्टर ऑफ जर्नालिझम, एम.एस्सी. अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त
एम.एस्सी. भौतिकशास्त्र, एम.एस्सी. रसायनशास्त्र, एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र, एम.एस्सी. प्राणिशास्त्र, एम.एस्सी. नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान, एम.एस्सी. सांख्यिकी (फक्त महाविद्यालय स्तरावरील अभ्यासक्रम), एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, एम.एस्सी. जैवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र, औषधनिर्माण सूक्ष्मजीवशास्त्र, एम.एस्सी. पर्यावरण विज्ञान, एम.एस्सी. संगणकशास्त्र, एम.ए. योगशास्त्र, वैद्यकीय माहिती व्यवस्थापन, बी.एस्सी.- एम.एस्सी. अर्थशास्त्र (एकात्मिक पाच वर्षीय अभ्यासक्रम), ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी (बी.लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्स), एम.एस्सी. गणित, मास्टर ऑफ सोशल वर्क (एम.एस.डब्ल्यू.), एम.बी.ए. ग्रामीण व्यवस्थापन, एम.टेक. ग्रामीण तंत्रज्ञान (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट), एम.ए. जनसंज्ञापन (मास कम्युनिकेशन), एम.एस्सी. अन्न विज्ञान व तंत्रज्ञान, एम.ए. प्रवास व पर्यटन अभ्यास, एम.ए. रशियन भाषा, एम.ए., एम.एस्सी. भूगोल, पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम (बॅचलर ऑफ जर्नालिझम), पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ जर्नालिझम), एम.एस्सी. भू-माहितीशास्त्र (जिओइन्फॉर्मेटिक्स), एम.एस्सी. अर्थशास्त्र (लॅटरल एन्ट्री) आदी २९ अभ्यासक्रमाची पुनर्प्रवेश परीक्षा होणार आहे.
पुनर्प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
रिक्त जागांच्या प्रवेशासाठी पुनर्प्रवेश परीक्षा बुधवारी (दि.२४) विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात होणार आहे. पुनर्प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी १३ ते २० जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत. विद्यार्थ्यांना केवळ एका अभ्यासक्रमासाठीच प्रवेश परीक्षा देता येणार आहे, असे निर्देश कुलसचिव डाॅ. व्ही. एन. शिंदे यांनी दिले आहेत.