

कोल्हापूर : कोल्हापूरच्या लेकी दिल्लीत करवीर निवासिनी अंबाबाईचा गोंधळ घालणार आहेत. निमित्त आहे, राष्ट्रीय युवा महोत्सवाचे! दिल्लीतील प्रगती मंडप येथील भारत मंडपम्मध्ये शनिवारपासून होणार्या या महोत्सवात उषाराजे हायस्कूलच्या मुली लोकगीत प्रकारात राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावलेल्या या संघाची दिल्लीत दि. 10 ते दि. 12 जानेवारी या कालावधीत होणार्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. बुधवारी या संघाने राज्यपाल आचार्य देवव—त यांनी मुंबईत राजभवनात संघातील खेळाडूंशी संवाद साधत त्यांना महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, मंगळवारी खासदार शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, राज्य संघ व्यवस्थापक शाहीर विशारद आझाद नायकवडी उपस्थित होते.
उषाराजे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी शाहीर श्रद्धा तानाजी जाधव ही आई अंबाबाईचा गोंधळ स्पर्धेत सादर करणार आहे. तिला जान्हवी कांबळे (कमला कॉलेज), पायल खोचीकर, लावण्या चव्हाण, कल्याणी चव्हाण, अनुष्का शिंदे, रुद्राक्षी हिरेमठ (उषाराजे हायस्कूल) या विद्यार्थिनी सहगायनाची साथ देणार आहेत. ढोलकीची साथ रामदास देसाई, तर ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, पेठ वडगावचा दहावीचा विद्यार्थी श्रेयश जाधव (सांगली) हा संबळ वादनाची साथ करणार आहे. न्यू कॉलेजचा ओम तारे हार्मोनियमची साथ देणार आहे.