

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डीसी : मधुमेह किंवा हृदयविकार यासारख्या व्याधी असल्यास अमेरिकेत कायम वास्तव्यासाठीचा व्हिसा घेऊ इच्छिणार्या परदेशी नागरिकांचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी तसे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे ज्यांची मुले अमेरिकेत स्थायिक झाली आहेत, अशांच्या आई-वडिलांना यापुढे कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना म्हणजेच ग्रीन कार्ड मिळणे अधिक अवघड होणार आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने जगभरातील दूतावास कॉन्सुलर अधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदाराचे वय, भविष्यात त्यांना त्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी सार्वजनिक सुविधांचा वापर करावा लागण्याची शक्यता कितपत आहे आदींचा अंदाज घेऊन व्हिसा अधिकारी त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारू शकतात. अशा आरोग्य किंवा वयाशी निगडित कारणांमुळे अर्जदार अमेरिकेसाठी ‘पब्लिक चार्ज’ म्हणजे सार्वजनिक संसाधनांवर भार ठरू शकतात, असे त्यात म्हटले आहे. सरकारवर ज्यांच्यामुळे आर्थिक भार पडू शकेल, अशांना व्हिसा नाकारण्याबाबतची ‘पब्लिक चार्ज’ची कायदेशीर तरतूद 100 वर्षांपूर्वीही आहे.
आतापर्यंतही व्हिसा प्रक्रियेत क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारांचे तपासणी प्रमाणपत्र व लसीकरणाची हिस्ट्री देणे आवश्यक होते. नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, आरोग्य स्थितींची यादी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. शिवाय, अर्जदाराच्या आरोग्यावर आधारित निर्णय घेण्याचे अधिक अधिकार व्हिसा अधिकार्यांना मिळणार आहेत.
ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांची देशाबाहेर हकालपट्टी करण्याची कडक मोहीम यापूर्वीच सुरू केली आहे. या मोहिमेत काही देशांच्या निर्वासितांवर बंदी, मोठ्या प्रमाणात दैनंदिन अटक मोहीम, तसेच अमेरिकेत येणार्या स्थलांतरितांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी करण्याच्या योजनांंचा समावेश आहे. त्याचाच भाग असून, कायदेशीर स्थलांतरही कमी प्रमाणात व्हावे, असा प्रयत्न या मागे आहे.
हे व्हिसा नियम टूरिस्ट (बी वन/ बी टू) किंवा विद्यार्थी (एफ वन) अशा व्हिसा अर्जदारांसाठी लागू आहेत की नाहीत, हे स्पष्ट झालेले नाही.
60 वर्षांवरील भारतीय ग्रीन कार्ड अर्जदारांवर काय परिणाम होईल?
60 वर्षांवरील भारतीय ग्रीन कार्ड अर्जदारांसाठी हा नियम अत्यंत कठीण ठरेल. कारण, त्या वयातील लोकांना मधुमेह, हृदयविकार किंवा इतर दीर्घकालीन आजार असण्याची शक्यता जास्त आहे. या आजारांमुळे भविष्यात अमेरिकन सरकारला सातत्याने आणि महागडा वैद्यकीय खर्च करावा लागेल, असे समजून व्हिसा अधिकारी त्यांचा अर्ज नाकारू शकतात.