

कोल्हापूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणार्या मालावर आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा थेट फटका कोल्हापूरला बसण्याची शक्यता आहे. अमेरिका ही जिल्ह्यासाठीची सर्वात मोठी परदेशी बाजारपेठ आहे. यावर्षी जिल्ह्यातून अमेरिकेत 2 हजार 75 कोटींची निर्यात झाली आहे. मात्र, या निर्णयामुळे भविष्यात त्यात घट होण्याची भीती असून वाहनांचे सुटे भाग, वस्त्रोद्योगासह कृषी उत्पादनांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातून टो पार्टस्, टेक्स्टाईल, कोल्हापुरी साज यासह गूळ, स्वीटकॉर्न, बेबी कॉर्नसारखी कृषी उत्पादने अमेरिकेला निर्यात होतात. जिल्ह्यातून यावर्षी दहा देशांत 4 हजार 908 कोटींची निर्यात झाली. यापैकी सुमारे निम्मी 2 हजार 75 कोटींची निर्यात ही केवळ एकट्या अमेरिकेत झाली असून, 50 टक्के निर्यात उर्वरित 9 देशांत झाली आहे. जिल्ह्यातून झालेल्या एकूण 4 हजार 908 कोटींच्या निर्यातीत सर्वाधिक निर्यात 1 हजार 820 कोटींची सर्वाधिक निर्यात आभियांत्रिकीशी संबधित, तर वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांची 1 हजार 464 कोटींची निर्यात झाली आहे.
ऑटो पार्टस्सोबतच कोल्हापूरच्या गुळाची अमेरिकेतील बाजारपेठ हळूहळू विकसित होत आहे. मात्र, त्यावर आयात शुल्काचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत 100 टक्के आयात शुल्क असल्याने गुळाचा दर प्रतिकिलो 160 रुपयांपर्यंत आहे. तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नव्याने शुल्कवाढ झाल्यास गुळाच्या या विकसनशील बाजारपेठेला मोठा फटका बसण्याची भीती आहे. याबरोबर कोल्हापुरी चप्पल अमेरिकेत निर्यात करण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात होते. टॅरिफचा निर्णय झाल्यास या प्रयत्नामध्येही अडथळे येऊ शकतात, अशीही भीती आहे. कोल्हापूरच्या निर्यातीचे अमेरिकेवरील अवलंबित्व पाहता ट्रम्प यांच्या संभाव्य धोरणामुळे निर्माण होणार्या आव्हानांवर पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक आणि निर्यातदार लक्ष ठेवून आहेत. टॅरिफबाबतची स्पष्टता येईल, त्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच नेमका कसा परिणाम होणार, हे स्पष्ट होईल.
अमेरिका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 मध्ये जिल्ह्यातून 1 हजार 759 कोटी रुपयांची निर्यात अमेरिकेसाठी झाली होती. यावर्षी त्यात आणखी वाढ झाली. एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत जिल्ह्यातून अमेरिकेत 2 हजार 75 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.