मी साधा माणूस; मला साधेच राहू द्या : यूपीएससी उत्तीर्ण बिरदेव डोणे

मुरगूड, यमगेत जल्लोषी सत्कार, जेसीबीने फुलांचा वर्षाव
UPSC pass Birdev Done felicitated in Murgud, Yamge
कोल्हापूर : आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल बिरदेव डोणे यांचा यमगे ग्रामस्थांतर्फे सत्कार करताना सरपंच विशाल पाटील, एम. डी. देवडकर. समवेत आई-वडील, भाऊ व मित्रमंडळी. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : आपण 2021 पासून यूपीएससीची तयारी सुरू केली. तेव्हापासून कधीही दोन महिनेही गावाकडे बकरी राखायला गेलो नाही. त्यामुळे मी मेंढ्या पाळून अभ्यास केला हे सोशल मीडियातून व्हायरल झाले, पण तसे नाही, असे सांगतच ‘मी साधा माणूस आहे, मला साधेच राहू द्या. साधेपणातच श्रीमंती आहे’, अशा आपलेपणाच्या भावना यूपीएससी उत्तीर्ण बिरदेव डोणे यांनी रविवारी व्यक्त केल्या. गोरगरीब शेतकरी, मराठा, बहुजनांची मुले प्रशासनात आली तर प्रशासन आणखी सुधारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धनगरी ढोल-ताशांचा गजर... रस्त्यावर रांगोळ्यांचा सडा... फटाक्यांची आतषबाजी... दुचाकीवरून घोषणा देणारी तरुणाई व ग्रामस्थांच्या उत्साही वातावरणात बिरदेव डोणे यांचे मुरगूड व यमगेत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

मुरगूड येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बिरदेव व त्यांच्या कुटुंबीयांनी अभिवादन केले. यावेळी मुरगूडवासीयांनी शिवप्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, संकेत शहा, जगदीश गुरव प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर डॉल्बीचा दणदणाट, लेझीम व धनगरी ढोल यांच्या निनादात डोणे यांची सजविलेल्या उघड्या जीपमधून मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. वडील सिद्धाप्पा, आई बाळाबाई, बहीण लक्ष्मी व भाऊ वासुदेव सोबत होते.

आमदार गोपीचंद पडळकर, मल्हार सेनेचे बबन रानगे यांनी धनगरी घोंगडी व पुष्पहार घालून डोणे यांच्या सत्कार केला. शहरात व रस्त्यावर ठिकठिकाणी त्यांचे औक्षण केले जात होते. मुरगूड बाजारपेठ, शिंदेवाडी मार्गे मिरवणूक यमगे गावात आली. त्याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण झाली. प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ पाटील, जय महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक मारुती पारळे यांच्यासह शिक्षक व मुलांनी स्वागत केले. जैन्याळच्या मराठी प्राथमिक शाळेतील मुलांच्या लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. बिरदेव यांच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बिरदेव डोणे यांच्यासह कुटुंबिय व त्यांना मदत करणार्‍या मित्रांचा यमगे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच विशाल पाटील व कीर्तनकार एम. डी. देवडकर यांच्या हस्ते सत्कार झाला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना डोणे म्हणाले, यश म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठा अधिकारी होणे नाही, तर कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोहोचणे हे खरे यश आहे. चांगल्या मित्रांची संगत ठेवा, व्यसनापासून दूर राहा. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवा. स्पर्धा परीक्षा देणार्‍यांनी आपले काय चुकते, ते तपासून पाहा. स्वत:चे मूल्यमापन करा, तरच जीवनात यश मिळविता येईल, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.

शालेय जीवनात चांगल्या शिक्षकांशिवाय गुणवंत विद्यार्थी घडूच शकत नाहीत. शिक्षकांनी ठरविले तर जगाचा कायापालट होऊ शकतो, असे सांगत यमगे गावातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह दहावी, बारावीत टॉपर विद्यार्थी दिले आहेत. त्यामुळे दरवर्षी असेच मोठे सत्कार ग्रामस्थांनी करावेत. जे विद्यार्थी करिअरसाठी झगडत आहेत, त्यांना समाजाने उचलून घ्यावे, त्यांना आर्थिक, मानसिक आधार द्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपला संघर्षपटच उलगडून दाखवला.

शेळीच्या दुधाचे गुणधर्म सांगणारे उत्तर मुलाखतकारांना भावले

यूपीएससीच्या मुलाखतीवेळी मला छंद कोणता? हे विचारण्यात आले. शीप व गोट रेअरिंग हा छंद सांगितला. त्यावेळी मुलाखत घेणार्‍यांनी शेळीचे दूध वाढण्यासाठी काय करायला पाहिजे. डॉक्टर शेळीचे दूध का प्यायला सांगतात हे प्रश्न विचारले. शेळी विविध वनस्पतींचा पाला खाते, त्याचा अंश दुधात उतरतो असे उत्तर दिले. हे उत्तर मुलाखत घेणार्‍यांना भावले. शेळ्या-मेंढ्यात रमताना कसलीही लाज वाटत नाही, असेही डोणे म्हणाले.

महापुरुषांचे विचार डोक्यावर नव्हे; तर डोक्यात घ्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अडचणीवेळी कसे बाहेर पडायचे ही दूरद़ृष्टी व अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची कला शिकली पाहिजे. राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला घडविण्याचे काम केले, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर झटले. अशा महापुरुषांचे विचार डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेऊन आचरणात आणा, असे आवाहन डोणे यांनी केले.

मिरवणुकीत नागरिकांनीच लावली वाहतुकीस शिस्त

मुरगूड : येथील बाळूमामांची अमावस्या यात्रा रविवारी आल्यामुळे तसेच बिरदेव डोणे यांची मिरवणूक निपाणी - राधानगरी मार्गावरून निघाल्याने यावेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. तासभर वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनाही त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी सामाजिक भावनेने भर उन्हात रस्त्यावर दोन तास उभा राहून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. मुरगूड येथील शिवभक्तांनी आदमापूर येथील रुक्मिणी हॉटेल, निढोरी - कागल फाटा आणि निढोरी पुलाच्या पुढील मुरगूड शहराच्या बाजूस वाहतूक सुरळीत करून वाहनांना योग्य मार्गावरून पुढे जाण्यास मदत केली. यामुळे पोलिसांना मोठी मदत झाली. शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, सागर चितळे, विशाल मंडलिक यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news