Kung Fu Legend Robot | आता आला कुंग फू लेजेंड रोबो

मार्शल आर्टस्‌, ४ मीटर उंच उडी आणि कारपासून बचाव
 Kung Fu Legend Robot |
Kung Fu Legend Robot | आता आला कुंग फू लेजेंड रोबो
Published on: 
Updated on: 

बीजिंग : विचार करा, तुमच्यासमोर एखादा घुसखोर चाकू घेऊन आला आणि त्याला अडवण्यासाठी कोणतीही व्यक्ती नाही, तर एक रोबो उभा राहिला. तो कारवर उडी मारतो, दरवाजावर लाथ मारतो आणि रस्त्यावर अपघातात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पुढे धावतो. ऐकताना हे एखाद्या हॉलीवूड चित्रपटातील दृश्यासारखे वाटते; मात्र, चीनमधील रोबोटिक्स कंपनी ‘युनिट्री रोबोटिक्स’च्या एका नव्या ह्युमनॉईड रोबोच्या प्रोमोशनल व्हिडीओमध्ये अगदी असेच दाखवले गेले आहे.

हांगझोऊस्थित युनिट्री रोबोटिक्सने बुधवारी H2-X चा व्हिडीओ जारी केला. यात त्याचे नाव ‘कुंग फू लेजेंड गार्डियन’ असे सांगण्यात आले आहे. हा रोबो कंपनीच्या सध्याच्या H2 प्लॅटफॉर्मवर आधारित असल्याचे दिसते. याची उंची सुमारे १.८२ मीटर (१८२ सेमी) आणि वजन ७० किलोग्रॅम आहे. मूळ H2 मॉडेलमध्ये ३१ ‘डिग्रीज ऑफ फ्रीडम’ आहेत. म्हणजेच, रोबोचे विविध अवयव किती मुक्तपणे फिरू शकतात किंवा हालचाल करू शकतात, हे या संख्येवरून स्पष्ट होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रोबोचा शक्तिशाली ‘जॉईंट टॉर्क’ (सांध्यांमधील फिरणारा बल/शक्ती) देखील दाखवण्यात आला आहे.

याच ताकदीच्या जोरावर हा रोबो मार्शल आर्टस्‌च्या हालचाली करताना, उंच उड्या मारताना आणि कारच्या दरवाजावर जोरदार प्रहार करताना दिसतो. H2-X च्या व्हिडीओमध्ये रोबोला अनेक असे स्टंटस्‌ करताना दाखवले गेले आहे, जे एखाद्या ॲक्शन चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटतात. या व्हिडीओमध्ये रोबो मार्शल आर्टस्‌ आणि कुंग फूचे प्रकार करताना दिसतो. तो कारच्या छतावर उडी मारतो, कारच्या दरवाजावर लाथा आणि ठोसे मारून दरवाजाचे नुकसान करतो, तसेच सुमारे ४ मीटर उंचीवरून उडी मारून जमिनीवर उतरतो. इतकेच नव्हे तर, चाकू घेऊन समोर येणाऱ्या घुसखोराचा तो सामना करतो; कारचा पुढील भाग उचलून त्याखाली अडकलेल्या डमीला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि वेगाने येणाऱ्या कारच्या मार्गातून पादचाऱ्याच्या डमीला ओढून बाजूला काढतो.

या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कंपनी रोबोची शारीरिक ताकद, चपळता आणि संभाव्य सुरक्षा व बचाव क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, हे सर्व सध्या केवळ एका व्हिडीओ क्लिपचा भाग आहेत. वास्तविक आणीबाणीच्या किंवा संकटकालीन परिस्थितीत या रोबोची ही प्रमाणित कामगिरी मानली जाऊ नये. रोबोच्या बॅटरी क्षमतेबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, H2-X एका चार्जवर सुमारे आठ तासांपर्यंत उभा राहू शकतो. मात्र, या संपूर्ण वेळेत तो पूर्णपणे सक्रिय (ॲक्टिव्ह) राहील की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, कंपनीने या रोबोचे सविस्तर तांत्रिक तपशील (स्पेसिफिकेशन्स) अद्याप जाहीर केलेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news